बीड : “आपल्या अडचणी बाजूला ठेवून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी मोठमोठ्या रक्कमेचे चेक जाहीर करताय, त्यावरील आकडे पाहून मला अक्षरशः भोवळ आली. परंतु मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. तुमचे चेक, तुमची रक्कम घेणे माझ्या स्वाभिमानी बाण्याला प्रशस्त वाटत नाही. हा स्वाभिमान तुम्हीच मला दिलाय. आई कधी लेकराच्या ताटातील खात नसते. त्यामुळे तुमची ही रक्कम मी घेऊ शकत नाही. केवळ तुमचे प्रेमच मला हवे आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी समर्थकांना आवाहन केले. वैद्यनाथ कारखान्याला झालेल्या दंडानंतर समर्थकांनी हा दंड भरण्यासाठी मोठमोठ्या रकमेचे चेक सोशल मिडीयातून व्हायरल केले होते. यावर पंकजा मुंडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून समर्थकांना आवाहन केले आहे. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वकील, सीए यांचे सल्ले घेत आहे. मला संकटे काही नवीन नाहीत. परंतु या प्रत्येक संकटात तुम्ही माझ्यासोबत राहीला आहात. त्यामुळे आपले नाते अधिक घट्ट होत आहे. श्रीकृष्णांना गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी त्यांच्या सवंगड्यांनी मदत केली. तुमची देखील तशीच इच्छा आहे. परंतु तुमची मला केवळ साथ हवी आहे. तुमच्याकडून पैसे घेणे मला प्रशस्त वाटत नाही. लवकरच आपण सर्वजण या संकटातून बाहेर पडू, असेही पंकजा मुंडे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.


