अकोला | शासनातर्फे 15 वर्षांवरील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता व जीवन कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘नवसाक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. नवसाक्षरता अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, वय 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान आदी पायाभूत साक्षरता, महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करणे हा अभियानाचा उद्देश आहे. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता व उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून व्यावसायिक कौशल्येही विकसित करण्यात येतील. या अभियानात प्रौढ शिक्षणासाठी विविध व नाविन्यपूर्ण उपक्रम. समुदाय सहभाग आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याद्वारे 100 टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत होणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्वेक्षण करून गावोगाव या अभियानाबाबत भरीव जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी या बैठकीत दिले.