शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार पावसामुळे कोपरा बु., चातारी, बोरी, सह तालुक्यातील शेतातील पिके प्रचंड प्रमाणात खरडून गेल्यामुळे उसनवारी बँक कर्ज पदरमोड करून शेतात पीक पेरणी केली व प्रत्येक शेतकरी शेतातील पिकांची हिरवी स्वप्ने बघू लागला अशातच काल रात्रीच्या पावसासोबत ती स्वप्ने वाहून गेली.
राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा जगाचा पोशिंदा शेतकरी राजा ने अगोदरच हवालदिल असलेल्या परिस्थितीतही आपल्या शेतात पेरणी केलेल्या पिकाचे नुकसान बघून त्यांचे डोळे स्वप्नहीन झालेले चित्र आज बघावयास मिळत आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील कोपरा बुद्रुक, चातारी, बोरी येथील शेतातील ऊस कापूस सोयाबीन हळद इत्यादी पिके पूर्णतः खरडून गेली या भागातील पाहणी करण्याकरता उमरखेडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आनंद देऊळगावकर तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी या गावातील शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून प्रत्येक शेतातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येईल व शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतही मिळेल तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये, तसेच अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळे तालुक्यातील कोणत्याही नागरिकाने पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये, पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही पुलावरील नाल्यावरील पुराचे पाणी कमी झाल्याशिवाय ओलांडू नये, घरामध्ये पाणी शिरत असताना सुरक्षित स्थळी सहकुटुंब स्थलांतरित व्हावे असे आवाहन तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी केले. यावेळी कोपरा बुद्रुक येथील रितेश पाटील कदम यांचे सह शेतकऱ्यांनी झालेल्या पिकाच्या नुकसानीची मदत मिळावी असे निवेदन तहसीलदार यांना दिले .