निशांत सोनटक्के
शहर प्रतिनिधी पांढरकवडा
पांढरकवडा : पुणे येथील सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या जीवघेण्या कोयता हल्ल्यातून युवतीला वाचविणारा पांढरकवडा येथील युवक दिनेश मडावी यांचा गुरुकुल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिनेश मडावी हा पांढरकवडा येथील युवक असून तो पुणे येथे एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस करतो आहे. क्लासेस ला जात असताना त्यांच्यासमोर एका युवकाने युवतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. यावेळी त्या युवतीला वाचविण्यास कोणीही येत नाही हे पाहून दिनेश मडावी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले साहस दाखवीत त्या युवतीला या जीवघेण्या हल्ल्यातून यशस्वीरीत्या वाचविले. या हल्ल्यात तो जखमी सुद्धा झाला.परंतु युवतीला यशस्वीरित्या वाचविले. दिनेश मडावी यांच्या या साहसी कार्याबद्दल गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे त्यांचा सत्कार घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुलींनी जागरूक राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा. कुणीही अन्याय अत्याचार सहन करू नये. एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनून समाजाचे रक्षण करावे असे प्रतिपादन केले. यावेळी विचार मंचावर शाळेचे संस्थाचालक मदन जिड्डेवार शाळेचे प्राचार्य स्वप्निल कुळकर्णी उपप्राचार्य अमित काळे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिनेश मडावी यांना शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.