अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ढाणकी ते सावळेश्वर रस्त्याची सुधारणा करणे हा रस्ता, ४४९.१८ लाख रुपयाचा रस्ता, त्याचा पूर्णत्वाचा दि. २३/१२/२०२२ असताना आज दि. ८/७/२०२३ उजाडले, तरीही रस्ता “जैसे थे” चं परिस्थितीत दिसत आहे. सदर रस्त्यावरून सावळेश्वर वासियांची ये-जा करताना त्रेधा तिरपीट उडत आहे. ढाणकी येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर अक्षरशः खराब रस्त्या अभावी शिक्षणाकरिता यायला जमत नसल्या कारणाने, त्यांच्या शाळा बुडत आहेत. सदर रस्ता एवढा चिखलमय झाला की, जर का सावळेश्वर मधून एखादा सिरीयस पेशंट किंवा एखादी गर्भवती महिला ढाणकी येथे दवाखान्यात आणायचे असल्यास, ढाणकी पर्यंत पोहोचेल का नाही? ही परिस्थिती सध्या तरी गंभीर रूप धारण करीत आहे. यावरून प्रश्न निर्माण होतो की सावळेश्वरला माणसे राहत नाहीत का? काम पूर्णत्वाचा दिनांक उलटून सात महिने होत आहेत, सदर कॉन्ट्रॅक्टदार रस्ता का करीत नसेल? सदर कंत्राटदाराने या रस्त्याचे कागदोपत्री बिल तर उचलले नसेल? म्हणूनच तर पूर्णत्वाचा दिनांक उलटून सात महिने झाले तरी रस्त्याची परिस्थिती खराबच आहे. अशी चर्चा सावळेश्वरवासी नागरिक करताना दिसत आहेत. पुसद येथील नवाब कन्स्ट्रक्शन कंपनी सदर रस्त्याचे कंत्राटदार असून, यावर कार्यकारी अभियंता म.ग्रा.र.वि. संस्था यवतमाळ ही कार्यान्वयन यंत्रणा आहे.
आता पावसाळा सुरू झाला आता तर रस्त्याचं काम होणारच नाही, परंतु चिखलमय झालेल्या रस्त्याचा काहीतरी तोडगा काढून, त्यावर लाल मुरूम टाकल्यास नागरिकांना दळणवळण यंत्रणा सोपी होईल. लाल मुरूमही कंत्राटदार का टाकत नसेल? हा एक यक्ष प्रश्न आ वासून नागरिकांच्या समोर उभा आहे. या आठ ते दहा दिवसात पावसामुळे रस्ता चिखलमय झाला व त्या रस्त्यामुळे, रस्त्यावरून ये-जा करणारे टू व्हीलर वाहनांच्या अपघातात वाढ झाली. अक्षरशः महिला, लहान बाळासहित, मोठी माणसे पडण्याचे प्रमाण वाढले. अजून कुणाचा रस्त्यावर जीव गेल्यावर सदर कंत्राटदाराला व संबंधित अधिकाऱ्यांना जाग येणार का? असा सवाल जनता करीत आहे.
चौकट
“सदर कंत्राटदाराला आम्ही फायनल नोटीस दिली असून, येत्या चार-आठ दिवसात त्यांनी रस्त्याची सुधारणा केली तर ठीक, अन्यथा त्या कंत्राटदाराचे काम रद्द करण्याची कारवाई आम्ही करू.व सावळेश्वर येथील नागरिकांचे दळणवळणाची व्यवस्था सुधारण्यासाठी पावसाळ्यामुळे सध्या तरी मुरूम टाकून प्राथमिक स्वरुपात काहीतरी व्यवस्था करू.”
- श्री तोडे (कार्यकारी अभियंता, प्र.ग्रा.स.यो. यवतमाळ)
“सावळेश्वर -ढाणकी रस्त्यावर हलक्या दर्जाचे मुरूम टाकून सर्व रोड ची माती झाली असून त्यामुळे काशिनाथ मानकरी यांचा पडून अपघात झाला. रस्ता चिखलमय झाला असून लवकरात लवकर काम पूर्ण नाही झाल्यास आंदोलन करण्यात येईल “
- परमेश्वर नारायण रावते (तालुका उपाध्यक्ष तथा
ग्रा. पं सदस्य सावळेश्वर)


