अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : सध्या देशभरात जरी उत्कृष्ट प्रकारचे महामार्गाचे बांधकाम चालू असले तरी खेड्यापाड्यात मात्र आजही दुचाकी जाईल असेही व्यवस्थित रस्ते नाहीत हे वास्तव आहे. शहरापासून जवळच असलेल्या सावळेश्वर गावाकडे जाणारा रस्ता अतिशय चिखलमय झाला असून वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. ढाणकी ते सावळेश्वर हे अंतर अंदाजे पाच किलोमीटर आहे. मात्र रस्त्याच्या दुरावास्थेमुळे एवढे अंतर पार करण्यासाठी साधारणतः दीड ते दोन तास लागत आहे. या कामात संबंधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोटा फक्त नावालाच असून तो हलक्या दर्जाचा मांजरा दगड असल्याचेही बोलले जात आहे. तसेच मुरूम हा माती मिश्रीत असल्याने आजच्या स्थितीला रस्त्यावर गुडघाभर चिखल झालेला आहे. अशा हलक्या दर्जाचे काम हाच ठेकेदार करत असून त्याने गांजेगाव रस्त्यामध्ये सुद्धा असाच प्रकार केल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. गंजेगाव रस्त्याची गुणनियंत्रक पथकाने चाचणी करूनही अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई नाही अशा बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला नेहमी कामे का दिली जातात हे सुद्धा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे एका मोठ्या राजकीय पक्षाच्या विद्यमान तालुकाध्यक्ष यांचे हे गाव असून स्वतः तालुकाध्यक्ष या गावात वास्तव्यास आहेत. तरीसुद्धा या रस्त्याची अशी दैना अवस्था झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत एकंदरीत या रस्त्यामुळे सावळेश्वर येथील नागरिकांचे जीवनमान ढासळत असून एखादी तात्काळ वैद्यकीय गरज जर निर्माण झाल्यास वाटतच त्या व्यक्तीचा जीव जाईल अशी स्थिती आहे.