अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी : 21 जून हा संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक योगा दिन म्हणून 2015 पासून घोषित केला त्यामुळे संपूर्ण जगभरात हा दिवस योगा दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. योग पद्धती ही जगाला भारताची देण असून असाध्य रोग सुद्धा बरे करण्याची ताकद योगामध्ये आहे. आजच्या धकाधकीच्या काळात माणसाला स्वतःला वेळ देण्यासाठी ही उसंत नाही. त्यामुळे वेगवेगळे आजार तोंड वर करत आहेत. या सर्वांपासून वाचण्यासाठी नियमित योग करणे हेच उपाय आहे. ढाणकी शहरातील हेल्थ इज वेल्थ हा योगा ग्रुप गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील नागरिकांना योगाचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून योगा करून घेत आहे. या ग्रुपचे संचालक गजानन चव्हाण हे नियमितपणे नागरिकाना योगा बाबत मार्गदर्शन करत असतात व त्यांना निरोगी बनवण्याचे अतुल्य कार्य करत आले आहेत. त्यांच्या संकल्पनेतून आज ग्रुप तर्फे जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस, उपनिरीक्षक कपिल मस्के, मोक्षधाम सेवा समितीचे अध्यक्ष सुभाष कुचेरिया, कृष्णा महाराज अमृते, बंडू अण्णा जिल्हावार हे होते तर पोलीस जमादार मोहन चाटे , संतोष मुंडे, चव्हाण, तगरे, खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता ही पौष्टिक अल्पोहाराने झाली.
हेल्थ वेल्थ योगा ग्रुप हा नियमितपणे उमरखेड रोडवरील गादिया लेआउट मध्ये योगासनाचा सराव करत असतो तरी याचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.


