मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी: आज दि.21 जून 2023 वाळूमाफीयांच्या दादागिरीला वैतागलेल्या गोदाकाठच्या जनतेचा अखेर सहनशीलतेचा अंत संपला असून बंडाचे दंड त्यांनी आता थोपटले आहे. हजारो ब्राश वाळू मस्तावलेल्या वाळू माफियांनी रामेवाडी, तेलसमुख शिवारात राजरोस साठवून ठेवलेली आहे. या वाळू साठवणुकीच्या ठिकाणी भाडोत्री ‘सांड’ दारू मटणाचे तुकडे तोडत रामेवाडीत अशांतता निर्माण करत आहेत. याबाबत महसूल प्रशासनास वेळोवेळी कळवून देखील दखल घेतली जात नाही. अखेर वाळू माफीयांच्या जुलमी वृत्तीच्या विरोधात संवेदनशीलतेचा अंत संपल्याने रामेवाडी, बोरखेड, तेलसमूख, जळगव्हाण ह्या गावच्या ग्रामस्थांनी रामेवाडी परिसरात असलेल्या अवैध वाळूचा शेकडो ब्रास वाळूसाठ्यावर ‘हल्लाबोल’ करत परळी तहसीलच्या वाळू विरोधी पथकाला कार्यवाहीस भाग पाडले. काल दिवसभर ह्याच विषयाने गोदाकाठ धुसफूस करत होता. रिटायर होत आलेल्या तहसीलदारांनी या ठिकाणी भेट दिली परंतु संतप्त ग्रामस्थांनी अवैध वाळूच्या मुद्द्यावर तहसीलदार अनिलवार यांना धारेवर धरले. निर्माण झालेल्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देखील तहसीलदारांना देता आले नाही.दि.18 ची रात्र जागून काढत दि.19 च्या कडक उन्हात रामेवाडी ग्रामस्थ ठिय्या मांडून होते. संतापलेल्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून वाळू माफियांनी गोदावरीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करत गावात दहशत निर्माण केली आहे. वाळू वाहतुकीने रामेवाडी, तेलसमुख येथिल शेत रस्त्याची पार वाट लावली आहे. तेलसमुख येथील काही शेतकरी महिलांनी याचा विरोध केला असता अवैद्य वाळू माफीयांनी त्यांना शिवीगाळ केल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. अवैध वाळू वाहतुकीने शेती रस्ते खराब झाले आहेत. शेतात बैलगाडी घेऊन जाणे सुद्धा अवघड झाले आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मस्तावलेले वाळू माफिया देत आहेत. एक प्रकारे वाळू माफियांनी गोदाकाठच्या लोकांवर जुलूमशाही सुरू केली आहे. परळी तहसील प्रशासन व बीड जिल्हा प्रशासन याकडे कानाडोळा करत आहेत. ही संबंधित प्रशासने कार्य करत नसल्याने अखेर वैतागलेल्या गोदाकाठच्या ग्रामस्थांनी शेकडो ब्रास अवैध वाळू साठ्यावर हल्लाबोल करत परळी तहसील वाळू विरोधी पथकाला कार्यवाहीस भाग पाडले आहे. आता अवैद्य वाळू साठवणुकीच्या ठिकाणी परळी तहसीलच्या वतीने तलाठी कांबळे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.


