अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
दिवसेंदिवस ढाणकी शहरातील पाणी समस्या उग्ररूप धारण करत असून आज शहरातील महिलांच्या संयमाचा बांध फुटला आणि संतप्त महिलांनी थेट नगरपंचायत कार्यालय गाठून घेराव घातला.संपूर्ण उन्हाळाभर शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा होत होता.आता उन्हाळा संपून पावसाची प्रतीक्षा असतानाही 20 दिवस पाणीपुरवठा होत नाही. यावर नगरसेवक सुद्धा कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. ही समस्या सांगण्यासाठी कार्यालयात गेल्यास विभाग प्रमुख हजर राहत नसल्याने प्रभाग क्रमांक 10, 11, 12,17, 16 मधील महिला संताप्त झाल्या आणि आपल्या लहान मुलांसह त्या नगरपंचायत कार्यालयावर धडकल्या. आज शनिवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती त्यामुळे संतप्त महिलांचा राग शांत करण्यासाठी नगरपंचायत चे स्वीकृत नगरसेवक शेख खाजा शेख कुरेशी हे महिलांना सामोरे गेले आणि त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून यावर निश्चितच नगरपंचायत प्रशासनाकडून उपाययोजना केली जाईल असे आश्वासन दिले. यामुळे संतप्त महिलांचा राग काही वेळ निवळला.ढाणकी ग्रामपंचायत चे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाले मात्र समस्या जैसे थे च आहेत . आजही शहराला पूर्णपणे पाणी उपलब्ध होत नाही. कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे प्रमुख हे प्रभागावर असल्याने शहरात कोणतीही विकास काम सुरळीत होत नाही. विशेष म्हणजे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आरोग्य आणि पाणी या विभागाच्या प्रमुख कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने या समस्यांनी उग्ररूप धारण केले आहे. समस्या मांडण्यासाठी नागरिक कार्यालयात आल्यास केव्हाच विभाग प्रमुख हजर राहत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तरी तातडीने शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा अशी संताप्त महिलांची मागणी होती. यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी राजू दवणे, विशाल खोपे, प्रमोद गायकवाड, उमेश करकले उपस्थित होते.


