विश्वास काळे ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. असे असले तरी,विदर्भासह देशभरात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु शासन त्यामध्ये लक्ष घालायला तयार नाही.याच मुद्द्याला धरून शेतकरी पुत्र अविनाश चंद्रवंशी यांनी थेट राष्ट्रपती व पंतप्रधान यांनाच पत्र लिहीले आहे. या अगोदर त्यांनी शेतकरी आत्महत्यां संदर्भात वेळोवेळी निवेदने सुध्दा दिली होती. या पत्रामध्ये त्यांनी शेती संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आताची तरुणाई शेती क्षेत्राकडे वळताना दिसत नाही आहे. याला जबाबदार येथील समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आहे. त्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे गरजेचे आहे. असा उल्लेख या पत्रात केला. सरकारने वरवरच्या उपाययोजना करून चालणार नाही. तर समस्येच्या मुळाशी जाऊन योजना आखावी लागणार हे आजवरच्या उपाययोजनातुन सिध्द झाले आहे. संपुर्ण देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढत असताना सरकार याबाबत ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. अजुन किती शेतकऱ्यांच्या मरणाची वाट सरकार पाहत आहे. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता खरिपाचा हंगाम जवळ आला आहे. आणि खरीपाच्या पेरणीच्या वेळेस बोगस बियाणे विक्रेते आपली पोळी भाजून घेतात त्यामुळे शेती क्षेत्राचे संरक्षण करणारे कायदे देखील अधिक कठोर करण्याची विनंती शासन दरबारी या पत्राद्वारे केली आहे. शेती क्षेत्राला वाचवण्यासाठी हजारो हातांची व डोक्याची निकड त्यामुळे येथुन पुढे शेतकरी पुत्रानी सजग राहणे आवश्यक आहे. हे मात्र निश्चित! आज घडीला शेतकऱ्यांप्रती असलेल्या संवेदना दिवसागणिक विरळ होत चालल्या आहेत. शेती व शेतकऱ्यांप्रती समाजाची संवेदना वृध्दिंगत होणे गरजेचे आहे. त्या शिवाय शेती क्षेत्राला समाजात प्रतिष्ठा राहणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी व शेती क्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या लोकांनी समोर् आल्याशिवाय शेतीला सुखाचे दिवस प्राप्त होणार नाही. त्यासाठी समाजातील हजारो अविनाश चंद्रवंशी समोर यावे लागतील.