गोविंद खरात
शहर प्रतिनिधी अंबड
अंबड : तालुक्यासह परिसरात आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू लागल्याने शेतीत लाकडी अवजारांचा वापर आता कालबाह्य होत चालला आहे.सद्यस्थितीत ट्रॅक्टरवर चालणारी विविध लोखंडी अवजारे बाजारात उपलब्ध झाली आहेत. तसेच बैलांच्या साह्याने वापरता येणारी लोखंडी अवजारेही तयार झाली आहेत. यामुळे आता लाकडी अवजारांचा वापर पूर्णतः थांबला आहे. यामुळे ग्रामीण भागातील लाकडी काम करणाऱ्या सुतारावर देखील उपासमारीची वेळ येतांना दिसून येत आहे.अंबड तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे सुरू असून बरेचसे शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील कपाशी उपटनी,नांगरणी तसेच वखरणी,पाळी करून शेतातील कामे उरकून घेऊन पेरणीच्या तयारीत आहेत. पावसाळा ऋतू काही दिवसांत लागणार असल्याने तालुक्यातील सर्व शेतकरी आपापल्या शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे मोठ्या जोमाने करू लागले आहेत.शेतकऱ्यांना एक एकर शेती नागरंटी करण्यासाठी १ हजार ५०० ते ७०० रुपये खर्च येत आहे. मागील काही वर्षांपासून लाकडी वखर, तिफन, कोळपे, बैलगाडीसह इतर शेतीपयोगी अवजारे कालबाह्य झाली आहेत. नवनवीन लोखंडी यंत्रांमुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती मशागतसुद्धा लोप पावत चालली आहे. शेती कामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे आता कालबाह्य झाली आहेत. कारण लाकडी अवजारांची वाढती किंमत तसेच त्यासाठी मजुरी व प्रत्येक वर्षी येणारा दुरुस्तीचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या अवजारांकडे वर्षभरही दुर्लक्ष झाले तर ही साधण मातीच्या संर्पकात आल्याने त्यांना उधळी लागते, व औजारे खराब होतात. त्यामुळे तुलनेने वापरायला सोईच्या असलेल्या लोखंडी अवजारांनी शेतीमध्ये बळकट स्थान मिळवले आहे. पेरणीसाठी लागणारी लाकडी तिफनही आता नजरे आड झाली आहेत.
अंबड तालुक्यात ऐन मशागतीच्या मौसमात बैलजोड्यांच्या किमती वाढल्याचे दिसून येत आहेत. आणि या किंमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्याने बैलजोडी खरेदी करण्यापूर्वी शेतकरी अनेकदा विचार करत आहेत. याशिवाय शेतात मजूर मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी हल्ली ट्रॅक्टरचाच उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने पूर्वी पासून वापरात असलेले लाकडी औजारे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वीच्या बलुतेदार पद्धती आता वेगाने बंद पडत आहेत. पूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीपयोगी साहित्याची दुरुस्ती केल्यास मुबलक प्रमाणात अन्न धान्याची रास मिळत होती. परंतु, मागील काही वर्षांमध्ये लाकडी अवजाराची जागा लोखंडी अवजारांनी घेतली आहे. तसेच लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांनी खर्च करणे टाळले आहे. परिणामी आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाले आहे.