पवन मनवर
तालुका प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याने चोरांचे फावत आहे. बुधवारी सायंकाळी चोरट्यांनी लग्नात नवरी मुलीस देण्यासाठी आणलेले तीन लाखांचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली असुन या घटनेची चौकशी सुरू असताना बुधवारी सायंकाळी राजूसिंग चव्हाण (रा. अमरावती) हे पत्नीसह घाटंजी तालुक्यातील कोळी खुर्द येथे जाण्यासाठी अमरावतीहून आले होते. ते बसमध्ये बसले असताना ते नवरीसाठी घेऊन जात असलेले तीन लाख रूपयांचे दागीने बॅगमधून चोरी गेल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी तातडीने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यवतमाळचे उत्तम स्थितीतील बसस्थानक पाडून येथे ‘बसपोर्ट’ करण्यासाठी चार वर्षांपूर्वी बसस्थानक तात्पुरत्या जागेत सुरू केले. येथे सुविधांची वाणवा आहे. जागा अपुरी असल्याने प्रवाशांची कायम गर्दी असते. सध्या लग्नसराई आणि सुट्टीसोबतच महिलांना अर्धी तिकीट झाल्यापासून बसमध्ये गर्दी वाढली आहे. हीच गर्दी चोरांचे लक्ष्य ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानकावर चोरींच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे.