शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : श्री. स्वामी समर्थ संस्थेचा १० वा वर्धापनदिन सोहळा १,२ व ३ मे २०२३ रोजी भाविकांच्या भरगच्च प्रतिसादात संपन्न झाला. घाटकोपर परिसरातील व बाहेरीलसुद्धा श्री स्वामी समर्थ भक्तांच्या वाढत्या प्रचंड सहभागाने संपूर्ण वातावरण स्वामी समर्थमय झाले होते. पहिल्या दिवशी विभागातून निघालेल्या समर्थ पालखी मिरवणूकीत प्रचंड प्रमाणात भाविकजन सामील झाले होते. रस्त्यारस्त्यावर भक्तगणांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. दुसऱ्या दिवशी इतर अनेक कार्यक्रमानंतर रात्री ८.०० वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक श्री. अजित कडकडे यांचा समस्त संगीतप्रेमी जनतेला व स्वामीभक्तांना अक्षरशः भारून टाकणारा व मंत्रमुग्ध करणारा भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अखेरच्या दिवशी संध्याकाळी स्थानिक जनतेसाठी स्वामी भंडारा आयोजित करण्यात आला होता. सुमारे पाच हजार भाविकांनी यावेळी प्रसाद ग्रहण करून समर्थांचे आशिर्वाद घेतले. दरम्यान तिनही दिवसात विभागातील अनेक मान्यवर समाजसेवकांनी आपल्या सहकार्यांसह येऊन स्वामी दर्शन व प्रसाद ग्रहण कले. संस्थेचे आदरणीय देणगीदार, घाटकोपर पोलीस दल, महापालिका व इतरही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी परिसरातील निर्माणाधीन इमारतींच्या रहिवाशी व बिल्डर्स यांनी ही आत्मियतेने सहकार्य केले. आणि शेवटी उल्लेख करावा लागेल तो मठातील निस्सीम सेवेकरी, नियमित भक्तगण, ( यामध्ये स्त्री-पुरुष दोन्ही आले,) यांनी दिवस रात्र न पाहता अफाट कष्ट उपसले. संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर सदस्य, सजावटकार यांचाही कार्यक्रमाच्या यशात मोठा वाटा होता. ह्या सर्वांना संस्थेच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद ! श्री स्वामी समर्थ ह्या सर्वांना उदंड आरोग्यमय यशस्वी जीवन प्रदान करो, हीच मनःपूर्वक सदिच्छा असे संस्थेने व्यक्त केले.