सतीश पाचपुते
तालुका प्रतिनिधी अकोले
अकोले : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने अकोले पंचायत समितीच्या सभागृहात आमदार डॉ किरण लहामटे यांचे अध्यक्षतेखाली सन 2023- 2024 या वर्षातील खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन व उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाणी टंचाई आढावा बैठक संपन्न झाली . अकोले तालुक्याचे तहसीलदार श्री थेटे , कृषी अधिकारी श्री हासे तसेच अकोले पंचायत समितीचे बीडीओ चौरे , कृषी अधिकारी श्री कोष्टी व तालुक्यातील सर्व विभागातील मान्यवर आणि ग्रामविकास अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते .ज्या ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला होता तेथील पंचनामे आणि जवळच्या धरणातील पाण्याची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला . शेतकरी वर्गासाठी बियाण्यांचा योग्य पुरवठा , खते नियमित मिळण्यासाठी कृषी विभागाने करावयाची योग्य कामे आदींबाबत योग्य सूचना आमदार लहामटे यांनी दिल्या. पिण्याचे पाणी योग्य स्थितीत पुरवठा करण्याची गरज असल्याचे मत तहसीलदार श्री थिटे यांनी व्यक्त केले .शेतकरी वर्ग अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात होरपळून निघाला असल्याने शासन म्हणून आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली पाहिजे असे आमदार साहेब यांनी सांगितले . काही ठिकाणी तातडीची मदत करणे गरजेचे असेल तर ती करायला हवी . बियाणांची खात्री करून शेतकरी वर्गाची फसवणूक होणार नाही यासाठी अधिक जागरूक राहण्या विषयी तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले . ही वेळ शेतकरी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याने अधिकारी वर्गाने वेळेत नियोजन करावे अशा महत्वपूर्ण सूचना बैठकीत संबंधित अधिकारी वर्गाला करण्यात आल्या.