अमरावती : अमरावतीमध्ये एका चौकीदाराने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चौकीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून कोतवाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. शुभम मनोज गुन्हाने (२५, रा. अमरावती) असे मृताचे, तर विनायक रामचंद्र रायबोले (६०, रा. रहाटगाव) असे चौकीदाराचे नाव आहे. या प्रकरणात मनोज बाबुराव गुल्हाने (५५, रा. पार्वतीनगर, अमरावती) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विनायक रायबोले हा मागील काही महिन्यांपासून शहरातील जवाहर गेट भागात असलेल्या महानगर पालिकेच्या संकुलात चौकीदार म्हणून कार्यरत आहे. त्याच संकुल परिसरात शुभमचेही वास्तव्य रहायचे. यापूर्वीही अनेकदा रायबोले आणि शुभम यांच्यात वाद व्हायचे. शुभम दारू पिवून रायबोलेसोबत वाद करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान बुधवारी (दि. ३१) रात्री बारा वाजताच्या सुमारास पाऊस सुरू होता. त्यावेळी रायबोले यांनी संकुलाचे शटर बंद केले व आतमध्ये ते आराम करत होते. त्यावेळी शुभम त्या ठिकाणी गेला व त्याने रायबोले यांना न विचारताच शटर उघडले. रायबोलेने त्याला हटकले असता त्यांच्यात वाद झाला. यावेळी दोघांमध्ये सुरूवातीला शाब्दीक चकमक व लोटलाटी झाली. या लोटालाटीत शुभम खाली पडला व त्याच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर रायबोलेने शुभमला काठीने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शुभमला कोतवाली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले मात्र, गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रायबोलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेवून अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती कोतवालीच्या ठाणेदार नीलिमा आरज यांनी दिली. शुभमविरुध्द शहरातील खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात मागील वर्षी चोरीचा गुन्हा दाखल होता. त्याच प्रकरणात त्याला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मालसुध्दा जप्त केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी कोतवाली पोलिसांनीसुध्दा शुभमवर संशयितरित्या फिरताना आढळल्याप्रकरणी कारवाई केली होती.