अकोला : सध्या रेल्वे मार्गाच्या दुस्तीच्या कामासाठी विदर्भातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. यात आता विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. 6 सप्टेंबरपर्यंत नागपूर पुढील मार्गावरील सेवा प्रभावित राहणार आहे. उत्सव काळात ट्रेनसेवा प्रभावित झाल्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या राजनांदगाव-कळमना तिसऱ्या मार्गाच्या कामासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगकरिता कोचेवानी स्टेशनवर तांत्रिक काम ३ सप्टेंबर कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातून धावणाऱ्या विदर्भ व महाराष्ट्र एक्स्प्रेस या दोन गाड्यांची धाव गोदिंयाऐवजी नागपूरपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. ही गाडी पुढे जाणार नाही.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार 12105 सीएसएमटी गोंदिया विदर्भ एक्सप्रेस ४ सप्टेंबरपर्यंत फक्त नागपूरपर्यंत धावरणार आहे. तसेच 12106 गोंदिया सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस 5 सप्टेंबरपर्यंत थेट नागपूर स्टेशनवरून सुटणार आहे. याशिवाय 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 4 सप्टेंबरपर्यंत नागपूरपर्यंत धावेल. 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस 6 सप्टेंबरपर्यंत नागपूरहून सुटेल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागत नागपूर व बिलासपूर स्थानकादरम्यान तिसऱ्या लाईनचे कामासाठी 6 सप्टेंबरपर्यंत 28 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.सध्या गणपती, गौरी उत्सवाचे दिवस आहेत. यामुळे प्रवासी मोठ्या संख्येत पर्यटन, विविध ठिकाणच्या धार्मिंक मंदिरामध्ये दर्शनासाठी भेट देतात. अशावेळी रेल्वेसेवा प्रभावित असल्यामुळे प्रवाशांची फरफट होणार आहे. वेळेवर प्रवाशांना एसटीचा प्रवास करणे भाग पडेल. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.


