अकोला, दि.१ – कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून वयवर्षे १५ ते १७ या वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला प्रत्येक विद्यालयाने गती द्यावी, मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन मागणी केल्यास लसीकरणासाठी विशेष सत्र शाळेतच आयोजित करण्यात येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मुख्याध्यापकांना आज येथे दिले.
कोविड लसीकरणाला गती देण्यासाठी आज अकोला शहर व परिसरातील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक आज नियोजन भवनाच्या छत्रपती सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबोधित केले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) डॉ. सुचित्रा पाटकर, डॉ. मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, २००७ मध्ये जन्मलेल्या मुलांसह त्या आधी जन्मलेली मुले ह्या लसीकरणासाठी पात्र आहेत. आगामी कालावधीत विविध शैक्षणिक उपक्रम, परीक्षा, प्रात्यक्षिके इ. राबवावयाची असतात. त्यावेळी विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. वय वर्षे १५ ते १७ या वयोगटात विद्यार्थी वर्गाची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण एकाच वेळी शाळेतच करणे शक्य आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन मागणी केल्यास शाळेतच एकाच वेळी लसीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष सत्र आयोजित करेल, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
लसीकरणासाठी विद्यार्थ्यांना सुचना
डॉ. अनुप चौधरी यांनी माहिती दिली की, ज्या विद्यार्थ्याला कोरोना झाला आहे, त्यांनी कोरोनामुक्त झाल्यापासून तीन महिने कोरोना लस घेऊ नये. त्यानंतर घ्यावी. तसेच किरकोळ वा अन्य व्हायरल स्वरुपाचा आजार असल्यास आजारातून बरे झाल्यावर लस घ्यावी. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लसीकरणासाठी येतांना घरुन पोटभर पौष्टिक व ताजे अन्न खाऊन यावे.