वाशिम : जिल्हयातील विविध प्रकारातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. अनेक दिव्यांग व्यक्तीकडे दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र नाही. त्या दिव्यांग व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे. दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासोबतच त्यांना वैश्विक ओळखपत्र देण्याची मोहिम मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
3 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविण्याबाबत आयोजित आढावा सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अस्थीरोगतज्ञ डॉ. विठ्ठल तिडके, वाशिम नगर पालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, रिसोडचे मुख्याधिकारी श्री. गायकवाड, मंगरुळपीरचे मुख्याधिकारी श्री. इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासोबतच त्यांना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा 2 डिसेंबर 2021 चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित यंत्रणांनी आपआपली जबाबदारी पाड पाडावी. जिल्हयातील ज्या दिव्यांगाचा शोध लागलेला नाही त्यांचे सर्वेक्षण करुन त्यांचा शोध घ्यावा. त्यांना प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र दयावे. दिव्यांगाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व जिल्हयातील काही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 31 जानेवारीपर्यंत शिबीराचे आयोजन करावे. शहरी भागात दिव्यांगाचा शोध घेण्यासाठी नगरपालीका/ नगरपंचायत आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा. असे त्यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी विशेष मोहिम कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनाबाबतची तसेच 3 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या युडीआयडी प्रकल्पाच्या वेबपोर्टलव्दारे दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व तालुकास्तरावर ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर शिबीराचे आयोजन करणे. 24 जानेवारी 12 फेब्रुवारी 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या युडीआयडी प्रकल्पाच्या वेबपोर्टलव्दारे दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रणालीमधील फॉर्मच्या बी भागातील वैद्यकीय प्रमाणपत्र बोर्डातील डॉक्टरांमार्फत निदान व मुल्यमापनाची ऑनलाईन नोंद करणे. 12 ते 28 फेब्रुवारी – वैद्यकीय प्रमाणिकरन निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना वाटप कार्यक्रम किंवा पोस्टाव्दारे वैद्यकीय प्रमाणपत्र, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, बस सवलत पुस्तिका तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामुहिक तथा प्रत्यक्ष लाभाच्या योजनांची माहिती घरच्या पत्यावर बाहय एजन्सीमार्फत पाठविण्यात येईल. 21 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत विशेष अध्ययन अक्षम आणि स्वमग्न प्रकारातील दिव्यांग बालकांना जिल्हा रुग्णालयस्तरावर दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रीया करण्यात येईल. 1 ते 10 मार्च या कालावधीत सर्व तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्राचे वितरण व मोहिम कार्यक्रमाचा अहवाल ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री. वाठ यांनी दिली.