बुलडाणा : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण याची निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ 6 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. पिकस्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर (0.10 हेक्टर) क्षेत्र आवश्यक आहे.
तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1000 हेक्टर हून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पिकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून त्याकरिता भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवर वरील स्पर्धेच्या निकालावरून पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.
एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत नव्हता आणि जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते काढून केवळ तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका जिल्हा विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
पारितोषिकाचा रकमा
स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गटात आहे. तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5000, द्वितीय 3000 व तृतीय बक्षीस 2000 रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10000 द्वितीय 7000 तृतीय 5000 रूपये, विभाग पातळीवर पहिले बक्षीस 25000 द्वितीय 20000 तृतीय 15000 व राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50000 द्वितीय 40000 तृतीय 30000 रूपये असणार आहे.