बुलडाणा, दि. 15 : जिल्ह्यात परदेशातून आलेली 67 वर्षीय पुरूष व्यक्ती कोरेाना बाधीत होती. सदर व्यक्तीचा नमुना ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. या नमुन्याचा तपासणी अहवाल ओमिक्रॉन पॉझीटीव्ह आला आहे. सदर रूग्णावर कोविड हॉस्पीटल, बुलडाणा येथे उपचार सुरू आहे. या रूग्णाची प्रकृती ठणठणीत असून रूग्णाच्या निकट संपर्कातील कुटूंबातील व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे. रूग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्ती निगेटीव्ह आल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. लसीकरण केलेले नसल्यास लसीकरण करून घ्यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला असेल व दुसऱ्या डोसचा कालावधी आला असेल, त्यांनी प्राधान्याने दुसरा डोस घेवून घ्यावा. तसेच प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. कुणीही मास्कशिवाय घराबाहेर पडू नये. सामाजिक सुरक्षा अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.