अकोला, दि.१५ –जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शुक्रवार दि. १७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरी भागातील मोहिमेकरिता महानरपालिका, नगरपरिषद, नगरपंचयातीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रभाग निहाय पथके तयार करण्यात आले आहेत. तरी दिव्यांगांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.नागरी भागात प्रभागनिहाय तयार केलेल्या पथकाव्दारे दिव्यांगाच्या सर्वेक्षणास शुक्रवार दि. १७ पासून सुरूवात करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात या कालावधीत घरोघरी पथकाव्दारे भेटी देऊन दिव्यांगांना मार्गदर्शन करतील. तसेच आपले सरकार सेवा केंदात दिव्यांगांचे नि:शुल्क नोंदणी केली जाईल. नोंदणी मोहिम दि. १७ ते ३१ या कालावधीत नि:शुल्क होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरी भागातील दिव्यांगांनी आपल्या नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.