अकोला : श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी बीजीई सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, महिला महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, डॉ. गुप्ता, ‘करिअर कट्टा’चे समन्वयक प्रा. आर.डी. चौधरी, डॉ. पूनम अग्रवाल, आशिष सरप आदी उपस्थित होते.
हा उपक्रम रोजागाराभिमुख असून, यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘उद्द्योजक आपल्या भेटीला’ यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. ‘करिअर कट्टा’ या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर रोजगाराभिमुख, उद्द्योजकर्ते विषयी व कौशल्य विकासासंबंधी विविध कोर्सेस ऑनलाइन उपलब्ध होतील. दैनंदिन चालणाऱ्या हया उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्क रुपये एक प्रतिदिन याप्रमाणे वर्षाला रुपये तीनशे पासष्ट आकारले जातील. संबंधित कोर्स पूर्ण केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. स्पर्धेच्या युगात शासनाच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी यांनी केले आहे.










