अकोला, दि.26 – रब्बी पीक कापणी प्रयोगाच्या सर्व्हेक्षणकरीता जिल्हास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. याअंतर्गंत कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाची अचूक आकडेवारी व निर्धारित वेळेत पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी मिळवून अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
पिकांचा उत्पन्न अंदाज काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग व अंमलबजावणीबाबतच्या कार्यशाळेचे आयोजन नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय कृषी अधिकारी के.बी. खोत, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी अधिकारी संध्या करवा, व्हि.एच.चव्हाण, कृषी पर्यवेक्षक एन.बी. राठोड, आर.आर. शेळके, पी.आर. घोंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, कापणी प्रयोगाच्या उत्पन्नाची अचूक आकडेवारी काढण्याकरीता नियोजन करा. पर्यवेक्षीय अधिकारी यांनी पिकांचे व गावांचे वाटप करुन अचूक सर्व्हेक्षण होईल याची दक्षता कृषी अधिकारी यांनी घ्यावी. पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षाची पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी घ्या. पीक कापणी प्रयोगाचे नियोजननिहाय 100 टक्के तक्ते पर्यवेक्षण अहवाल वेळेवर तयार करा. याकरीता प्रत्येक तालुक्यामध्ये तहसिलदार, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी यांनी कार्यालयात रजिष्टर ठेऊन नोंदी ठेवाव्या व दरमासिक सभेचा आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले.