अकोला, दि.26 – महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2021 करीता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन निवडणूक निर्भिड व पारदर्शकपणे पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
जिल्हाधिकारी दालनात विधान परिषद निवडणूकीसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उमेदवारांचे प्रतिनिधी सागर खंडेलवाल, सुभाषसिंह ठाकूर, जयंत पोडोपाध्य आदी उपस्थित होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक कार्यक्रम, अद्यावत मतदार यादीची माहिती, तिन जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या, मतदान करतानी घ्यावयाची काळजी व आचारसंहिता भंग होणार नाही याकरीता निवडणूक विभागाने जारी केलेल्या नियमाची माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिली. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीनेच मतदान व मतमोजणीकरिता उमेदवार व प्रतिनिधींना मतदान व मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येईल. निवडणूक निर्भिड व निपक्षपणे तसेच पारदर्शक पद्धतीने पार पडावी याकरीता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.