.महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२६:-येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष पनवेल शेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांना नुकतेच एक निवेदन सादर केले.खा.शरद पवार चंद्रपूर दौऱ्यावर आले असता भद्रावती येथील पिपराडे मंगल कार्यालयाजवळ त्यांचे फटाके फोडून ढोल-ताशांच्या गजरात एका भल्यामोठ्या पुष्पहाराने जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी त्यांच्या सोबत नगर विकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, रा.काॅ.चे संपर्क प्रमुख सुबोध मोहिते उपस्थित होते.यावेळी पनवेल शेंडे यांनी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सामाजिक न्याय विभाग) तर्फे शरद पवार यांना एक निवेदन सादर केले. सदर निवेदनात भद्रावती तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योजक बनण्याची संधी निर्माण करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. खुप वर्षांपासून आपल्या पार्टीची मनोभावे सेवा करीत आलेले पदाधिकारी तसेच कार्यकर्ते कोरोना काळापासून खुप हलाखीच्या परिस्थितीत असल्यामुळे आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ व सक्षम नेत्यांनी वरील विषय अंतर्मनाने समजून घेऊन आम्हा सर्वांना विचारात घेऊन रोजगार, स्वयंरोजगार तसेच उद्योजक बनण्याची संधी निर्माण करण्यासाठी पार्टीने आम्हाला सूचना व सुविधा लवकर सुचवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष फय्याज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, शहर उपाध्यक्ष (सा.न्या.वि.) राजेश नांदवार, सचिव वैभव जुलमे, युवा शहराध्यक्ष रोहन कुटेमाटे, संतोष वासमवार, कृष्णा तुराणकर, ईश्वर मस्के, विक्की खडसे, आकाश किनाके, आकाश दुपारे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.