अधिकारनामा वृत्त
अकोला, दि.18 : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार 198 ग्रामपंचायतीच्या 398 रिक्त पदाकरीता मतदान मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी तर मतमोजणी बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली. यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी संबंधित तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 30 नोव्हेंबर ते सोमवार दि. 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे. नामनिर्देशनपत्र छाननी मंगळवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक. गुरुवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करणे. बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील. सोमवार दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध होईल. पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केल्यापासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूकीचा निकाल जाहिर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहिल, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.