सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : आदिवासी युवक युवतीच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने अति दुर्गम भागात असलेले अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे भव्य आदिवासी रेला नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अनुज तारे,समीर शेख यांच्या संकल्पनेतून तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य आदिवासी रेला नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उदघाटन किरण नैताम सरपंच पेरमिली यांनी केले.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमिली,गणेश मडावी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पत्रकार शंकर दुर्गे, विजय आत्राम उपसरपंच येरमणार हे उपस्थित होते. रेला नृत्य स्पर्धेकरीता परीक्षक माऊलकर मुख्याध्यापक,भारत कोरडे अधीक्षक,कुसराम मुख्याध्यापक उपस्थित होते.सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली.मान्यवरांनी आदिवासी संस्कृतीबाबत माहिती विशद केली.सदर आदिवासी पारंपारिक रेला नृत्य स्पर्धे करिता पेरमिली परिसरातील अतिदुर्गम भागातील चंद्रा, मेडपल्ली, तुमरकसा, कोरेली, रापल्ले, आलदंडी, चंद्राटोला, पेरमिली, मिरकल या गावातील एकूण 16 रेला नृत्य संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमास 400 ते 450 प्रेक्षक उपस्थित होते. प्रत्येक रेला ग्रुपने उत्कृष्ठ रेला नृत्याचे सादरीकरण केले. त्या मधून पंचांनी त्यांना गुण वाटप केले.या रेला नृत्यात परिक्षकांनी दिलेल्या गुणांप्रमाणे चंद्रा रेला संघास प्रथम क्रमांक,आलदंडी रेला ग्रुपला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक मिरकल रेला ग्रुपला देण्यात आले.प्रथम, द्वितीय, तृतीय क्रंमांक पटकविलेल्या विजेत्या संघांना अनुक्रमे 3000 रू,2000 रू व 1000 रू. रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच इतर 13 संघांना, विशेष प्रोत्साहनपर रोख 501 रु. बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले.तसेच उपस्थित तरुण युवक युवतींना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन करून उप पोस्टे हद्दीमध्ये पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गाव तिथे अभ्यासिका ही योजना राबविणार असल्याबाबत माहिती देण्यात आली.सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि गंगाधर जाधव, जिल्हा पोलिस व सिआरपीएप चे अमलदारांनी संघभावनेने परिश्रम घेतले. सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना भोजनाची व्यवस्था करून मेळाव्याची सांगता करण्यात आली.











