गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
वान प्रकल्प हनुमान सागरातील पाणी विविध ठिकाणी पाणीपुरवठा योजनेसाठी दिले आहे. असे असतानाही पुन्हा बाळापूरसाठी पाणी वळविण्याचा घाट रचला जात आहे; मात्र या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांची शेती गेली त्या तालुक्यातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र आहे. पाणी पुरवठा सुरुळीत करण्यासाठी १५९ खेडी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेंतर्गत सर्वे क्षणसुद्धा झाले आहे; परंतु योजना लालफितीत अडकली असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र शासन जलसंपदा
विभाग शासन निर्णयानुसार कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास नागपूर यांच्याकडून महामंडळ, कार्यकारी अभियंता मजीप्रा विभाग, अकोला यांनी मागणी केल्याप्रमाणेतेल्हारा व अकोट तालुक्यातील १५९ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी वान नदी प्रकल्पाच्या डाव्या मुख्य कालव्यातून पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव होता. शासन निर्णयानुसार बिगर सिंचन
पाणी आरक्षण प्रस्तावाना मंजुरी देण्यासाठी क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादिनुसार सुधारित स्थळ निश्चित करून शासनाने मान्यता देऊन तेल्हारा व अकोट तालुक्यातील १५९ गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी वान नदी प्रकल्प कालव्यातून सन २०१९ची लोकसंख्या विचारात घेऊन पाणी आरक्षित केले होते. त्याप्रमाणे शासन निर्णय होऊन १५९ खेडी पाणी पुरवठा योजनेत तालुक्यातील८८ गावांचा व अकोट तालुक्यातील काही गावांना पिण्याचे पाणी मिळणार होते. त्यानुसार ५० लाख निधीत सर्वेक्षणसुद्धा झाले आहे. मंजूर योजनेसाठी गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील ठराव घेऊन व पाणी वितरण झोनसुद्धा पाडण्यात आले होते. असे असताना या योजनेचे घोडे कुठे अडले, असा प्रश्न केला जात आहे. ही योजना खऱ्या अर्थाने तालुक्यासाठी तृष्णा भागविणारी आहे. तालुक्यातील मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या त्या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यासाठी असलेली १५९ योजना पूर्ण करा व तसेच वान प्रकल्प सागराचे पाणी लाभधारकांना सिंचन व पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.











