श्रद्धा गढे
शहर प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा :-तेल्हारा येथील रहीवासी असलेल्या दीपिका ताई देशमुख यांचे शिक्षण जेमतेम १२वि पर्यंतचे. सुरुवातीला कुटुंब प्रमुखांची प्रकृती ठीक नसल्याने, कोणताही अनुभव गाठीशी नसताना सायकल दुरुस्ती च्या दुकानाची जबाबदारी सांभाळली. आजूबाजूला अनेक स्त्रिया उन्हातन्हात रोजगाराच्या शोधात दिसल्या आणि एक महिला म्हणून त्यांच्या वेदना जाणवल्या व त्यांनी या महिलांना आत्मनिर्भर करण्याचा निर्णय घेतला. मुलांकडून स्मार्टफोन हाताळणे शिकून गृह उद्योगाबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली आणि हातात येईल त्या शस्त्राने हि लढा ई लढण्याचा निर्धार त्यांनी केला. यातूनच त्यांनी सूर्योदय महिला गृह उद्योगाची सुरुवात केली पर्यावरण पुरक गणेश उत्सवाची संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी राळ, कपूर झेंडूची फुले, माती इ. पर्यावरण पूरक वस्तूचा वापर करून गणेश मूर्तीची निर्मिती करून अनेक महिलांना रोजगार निर्माण करून दिला. तसेच रंगपंचमीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामध्ये हळद, बिट, पालक, गुलाब, पळस, कोरफड, बेल, बटाटा, जास्वंद अश्या विविध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार केलेले रंग बाजारात उपलब्ध करून दिले, गाईच्या शेणापासून सुंगधी धूपबत्ती, पणत्या त्याचप्रमाणे कोरोना काळात ५०, ०००पेक्षा जास्त मास्क ची निर्मिती तसेच विविध प्रकारचे मसाले, पाणीपुरी, पापड दिवाळी चे फराळ यांची निर्मिती या गृह उद्योगाच्या मार्फत करून ३००महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम दीपिका ताई देशमुख यांनी निस्वार्थी पणे केले..










