शिरूर : होळीच्या दिवशी बाजारात मिळणारे रासायनिक रंग अनेकांना सहन होत नाहीत. हे रंग त्वचेला खराब करतात. संवेदनशील त्वचेच्या लोकांच्या समस्या वाढतात. अशा वेळी रंग खेळताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.अनेकदा रंगांमधील केमिकल्समुळे त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आपला थोडासा निष्काळजीपणा आपला चेहरा खराब करू शकतो. अशा वेळी विशेष काळजी घेण्याची गरज असते.२५ मार्च रोजी होळी असल्यामुळे आता रंगांची जोरदार उधळण सुरू होणार आहे. त्यामुळे केमिकलमुक्त सुरक्षित होळी खेळण्याचा प्रयत्न करा. यासाठी बाजारातील रंगांऐवजी घरगुती रंगांचा वापर करा. त्यामुळे तुमची त्वचा, केस आणि डोळ्यांना नुकसान होणार नाही. आरोग्यालाही हानी पोहोचणार नाही. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी रासायनिक रंग टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा जास्तीत जास्त वापर करा.होळी खेळण्याअगोदर तुमची त्वचा हायड्रेट करा. होळीच्या आदल्या रात्री तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या क्रिमने तुमची त्वचा हायड्रेट करा. त्यानंतर सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्याच्या मदतीने तुमची त्वचा अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून तसेच हानिकारक रंगांच्या प्रभावापासून सुरक्षित राहील. त्यामुळे रंग लावण्यापूर्वी त्वचा हायड्रेट करा. होळीचे रंग खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर पेट्रोलियम जेलीचा जाड थर लावा. त्यावर ऑलिव्ह आणि खोबरेल तेल लावा. रंग खेळण्यापूर्वी केसांना नीट तेल लावा. केसांची विशेष काळजी घ्या, जेणेकरून आरोग्याला हानी पोहोचणार नाही.जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त रंग लागला असेल, तर तो घासू नका. त्यामुळे पहिल्यांदा चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. त्यानंतर चांगल्या क्लिंझरने त्वचा स्वच्छ करा. यानंतर बेसन, हळद, तांदळाचे पीठ, गुलाबपाणी आणि थोडे खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ करा.चेहऱ्यावरील रंग काढून झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. जर तुम्हाला रॅशेसची समस्या येत असेल, तर ताजे कोरफडीचे जेल लावू शकता. होळीनंतर, दोन ते तीन दिवस चेहऱ्यावर कोणतेही रासायनिक मेकअप उत्पादन वापरणे टाळा. फेशियल किंवा ब्लीचसारखे उपचार करू नका.


