अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
आज 1 जानेवारी, 2023 इंग्रजी नवीन वर्षाचा प्रारंभ दिवस तर आहेच पण भारतीय बहुजन समाजासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे. कारण याच दिवशी 1818 साली 500 शुरवीर महारांनी पेशव्याच्या 28000 सैनिकांना सळो की पळो करुन अद्वीतीय विजय मिळविला आणि अस्पृश्यांना व समस्त बहुजन वर्गाला तत्कालीन पेशवाईच्या अमानवी गुलामीतून मुक्त केले. तसेच याच दिवशी 1848 साली क्रांतीसूर्य राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि क्रांतीज्योती सवित्रीआई फुले यांना त्या शाळेत शिक्षिका म्हणून नेमले. या दोन सामाजिक क्रांती व समाज परिवर्तनाच्या घटना व त्याचा इतिहास समस्त बहुजनांसाठी प्रेरणादायी आहे. या क्रांतीकारी विजय दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! 1 जानेवारी, 1818 साली इंग्रज व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यामध्ये झालेल्या भीमा कोरेगावच्या युद्धात तत्कालीन अस्पृश्यांनी ऐतिहासिक व अद्वीतीय विजय मिळवून जुलमी पेशवाईचा पराभव केला. त्या युद्धात शहीद झालेल्या अस्पृश्य महारांना मानवंदना देण्यासाठी व त्यांच्या विजयाची आठवण म्हणून इंग्रजांनी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला.1 जानेवारी,1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला भेट देवून आपल्या अनुयायांसमोर अत्यंत प्रेरणादायी भाषण केले होते आणि समाजाला भीमा कोरेगावच्या इतिहासाचे स्मरण ठेवून आम्ही नागवंशीय शूरवीर महारांचे वंशज आहोत.आम्ही लढवय्ये व पराक्रमी आहोत हे लक्षात घ्या आणि गुलामी व लाचारीचे जगणे सोडून स्वाभिमानाने जगा. त्यासाठी गुलामी विरुद्ध पेटून उठा व अन्याय अत्याचाराला गाडून टाकण्यासाठी प्राणाच्या मोलाने संघर्ष करा असा संदेश दिला होता.आजही या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी लाखो आंबेडकरी अनुयायी भीमा कोरेगाव येथे येतात. आपल्या पुर्वजांच्या शौर्याचे स्मरण करतात. तर दुसरीकडे याच दिवशी पुण्याच्या भिडे वाड्याला देखील मानवंदना दिली जाते. हा भिडे वाडा स्त्रिया व बहुजनांच्या शैक्षणिक क्रांतीचा विजयस्तंभच आहे. याच ठिकाणाहून या वर्गाला ज्ञानाचा तिसरा डोळा मिळाला आणि अज्ञान हेच आपल्या दारिद्र्याचे व शोषणाचे मूळ आहे याची जाणीव झाली. म्हणून बहुजनांच्या जीवनात या दिवसाचे मोल अनमोल आहे.बंधूजनहो आज पुन्हा छुप्या पध्दतीने नवी पेशवाई नव्या स्वरुपात लादण्याचे जोरकस प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी प्रथमतः नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा लागू करुन चातुर्वर्ण्य व्यवस्था प्रस्थापित करणारी शिक्षण पध्दती अमलात आणली जात आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्था भांडवलदारांच्या ताब्यात देवून शिक्षणाचे पुर्णत: खाजगीकरण व व्यापारीकरण केले जात आहे.
सर्वच मागासवर्गीय घटकांचे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी सरकारी उद्योग, कंपन्या, रेल्वे, बँका, पोष्ट, टेलीफोन, सरकारी प्रकल्प, जल, जमीन, जंगल खाजगी भंडावलदारांना विकले जात आहेत. सर्वत्र खाजगीकरण सुरू आहे.देशात प्रतिगामी शक्तीच्या हातातच शासन व्यवस्था टिकून राहावी यासाठी वेगळे वेगळे प्रयोग अंमलात आणले जात आहेत. देव, धर्म, मंदीर, मस्जिद या जुन्या वादां सोबतच आता लव्ह जिहाद सारखे प्रकार वाढवून देशात देवा धर्माच्या नावावर दंगली घडवून “हिन्दु धर्म खतरे मे है” अशी बतावणी केली जात आहे. ईव्हीएम मशीनचा गैरवापर करुन व लोकांना भावनिक गुलाम बनवून त्यांच्या भावनांचा सत्तेसाठी वापर केला जात आहे.सर्व संवैधानिक संस्थांना आपल्या हातातील कठपुतली करुन देशात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. प्रेस मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया खरेदी करुन आपला विकासाच्या मृगजळचा ढोल बडवला जात आहे. लोकशाही संविधानाला उघड उघड विरोध करणं सुरू झाल असुन आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलो असे जाहीर बोलून संविधान जाळण्यपर्यंत मजल गेली आहे. लोकशाहीत हुकुमशाही राबविली जात असुन लोकांच्या मुलभूत अधिकारचे हनन करुन अभिव्यक्ती स्वातंत्र्य व जीवन जगण्याच्या आधिकारावर गदा आणली जात आहे. देशात महागाई, बेरोजगारी, दारिद्र्य, भ्रष्टाचार, बलात्कार, अन्याय अत्याचार वाढले असुन त्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले जात आहे. न्यायाची भाषा करणारे, सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांवर टिका करणारे देशद्रोही ठरवून त्यांना जेल मध्ये डांबले जात आहे. फसव्या हिंदुत्वाचा बँड बडवून भारताला हिंदुस्थान व हिंदू राष्ट्र बनविण्याची भाषा करण्यासोबतच सभा समारंभांमधून जाहीररित्या बेताल वक्तव्ये केली जात आहेत. एक हाती सत्तेच्या राजकारणासाठी एन.आर.सी. व सीएए सारखे कायदे आणुन देशातील नागरिकांना आपलं नागरिकत्व सिद्ध करणं बंधनकारक केलं जाणार आहे. नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरलेल्यांना आश्रित ठरविण्यात येणार आहे. म्हणजे आता देशातील नागरिकांचे संवैधानिक नागरिकत्व अमान्य करुन त्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तर केला जाणार आहेच पण महत्वाचे म्हणजे त्यांचा मतदानाचा अधिकारही संपुष्टात आणण्याचा कुटिल डाव खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा अर्थ या देशातील आदिवासी, भटके विमुक्त व एस. सी. एस. टी. आणि ओबीसी वर्गाला निराश्रीत किंवा दुय्यम नागरिक ठरवून त्यांना पुन्हा गुलाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.एकुणच देशात प्रतिक्रांतीचे चक्र गतिमान झाले असुन क्रांतीला ग्लानी आली आहे. अशा बिकट परिस्थीतीत समाजात सक्षम व द्रष्ट्या सामाजिक व राजकीय नेतृत्वाचा अभाव दिसुन येत आहे. त्यामुळे समाजकारण, राजकारण व धम्मकारणात संभ्रम व वैचारीक गोंधळाची स्थिती निर्माण झाली असुन समाजात असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश बुद्धिवादी लोकं बुद्धिभेद करण्यात मश्गुल असुन काहीजण स्वत:चा मोठेपणा मिरवण्यासाठी आपापली दुकानदारी थाटुन आम्हीच बाबांचे खरे पाईक आहोत असा आभास निर्माण करण्यात धन्यता मानत आहेत तर समाजाची भावनिक दिशाभूल करुन त्यांचे शोषण करणारांचा तथाकथित नेतावर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्रतिक्रांतीला रोखायचे असेल तर हे सर्व थांबविले पाहीजे. नव्या लढाईसाठी सज्ज झालं पाहीजे.
विजय स्तंभाला मानवंदना देतांना आम्ही आमच्या पूर्वजांचा इतिहास, त्यांचे शौर्य, पराक्रम व स्वाभिमान ध्यानात ठेवून आमच्यासमोर उभी असलेली आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य अंगी बानविले पाहीजे. निर्भीड विद्वत्ता सिद्ध केली पाहीजे. लाचारी व गुलामी सोडून नव्या संघर्षासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहीजे. त्यासाठी बाबांचा संघर्ष समजून घेवून त्यांचा लढा कशासाठी होता हे जाणून खरे आंबेडकरवादी होणं काळाची गरज आहे.
आज आम्ही जे आहोत ते फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाच देणं व त्यागाचे फलित आहे हे आम्ही समजून घेतलं पाहीजे. केवळ वेगवेगळ्या संघटना, संस्था उभ्या करुन चालणार नाही तर शासनकर्ती जमात होण्यासाठी झटल पाहीजे. त्यासाठी बहुजन समाजातील सर्व जातीच्या नेत्यांमध्ये आंबेडकरी चळवळ ही सर्वांच्या हितासाठी आहे, ती आपल्या हक्काची व स्वभिमानाची चळवळ आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहल पाहीजे. यासाठी सर्व महापुरुष व त्यांच आपसातील वैचारीक नातं समाजात रूजवण्यासाठी सर्वसमावेशक प्रबोधनाची चळवळ गतिमान केली पाहीजे.
“एकीत जय बेकित क्षय” हे मर्म जाणून चार आंधळ्या सारखे वागणं सोडून दिल पाहीजे. बाबांचा समग्र संघर्ष व त्यांचे संदेश समजून घेवून नव्या संघर्षासाठी एकसंघपणे सज्ज झाल पाहीजे. तरच विजयस्तंभाला खरी मानवंदना ठरेल. चला तर मग बाबांना अभिप्रेत असलेले शिक्षित होवून संघर्ष करण्यासाठी संघटित होऊ या. सारे मतभेद व मनभेद सोडून सामाजिक क्रांतीच्या रथाला गतिमान करु या…! जयभीम, जयभारत, जय संविधान…!
- प्रा.डॉ.एम.आर.इंगळे, अकोला.