शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी व देशाला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संबंधीचे अतिशय घाणेरडे व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारीत झाले आहे. राजकारणाविषयी नेहमी बोलल्या जाते की,राजकीय क्षेत्र अतिशय घाणेरडे आहे,राजकारण गलिच्छ असते किंवा चांगल्या लोकांनी राजकारणात पडू नये.या घटनेवरून मात्र खरच राजकारण हे गलिच्छच असते याची खात्री लोकांना होणार आहे.एखाद्या पक्षाच्या एवढ्या मोठ्या जबाबदार व्यक्तीने असे बेताल वागणे हे त्या पक्षासाठी खूप शरमेची बाब आहे.यावर सर्वात आधी भाजपनेच स्वतः कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु तसे काही घडलेले नाही.
महिला राजकारणाविषयी सकारात्मक का नाही तर याचे उत्तर काही अंशी या प्रकरणात दडलेले आहे. एकतर महिला स्वतःच राजकारणाविषयी उदासीन आहेत आणि दुसरे म्हणजे घरूनही राजकारणात जाण्याची परवानगी नाही.यासाठी असे प्रकार निश्चितच कारणीभूत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत अर्धी लोकसंख्या असलेली महिला ही इतर क्षेत्रासारखी राजकीय क्षेत्रात अग्रेसर का नाही हा विषय नक्कीच चिंतनाचा व चिंतेचा आहे.अगदी बोटावर मोजण्या इतक्याच महिला राजकारणात येतात. याचे कारण हेच आहे की,या क्षेत्रात महिलांना सुरक्षित वाटत नाही. या नेत्यांच्या अशा अनेक घटना आजवर आपण पाहिलेल्या आहेत.स्वतःला जनतेचे सेवक म्हणायचे, जनतेची आणि महिलांची किती काळजी आहे आणि त्यांचा आपण किती सन्मान करतो अशा खोट्या बाता आपल्या भाषणात मारायच्या आणि दुसरीकडे त्याच महिलांचे शोषण करायचे, त्यांना ब्लॕकमेल करायचे असे घाणेरडे प्रकार हे राजकारणी करत आहेत. संपूर्ण राजकीय क्षेत्र यांनी बदनाम करून ठेवलं आहे. खरंतरं राजकारणाशिवाय पर्याय नाही.देशाचा कारभार राजकरणाशिवाय चालूच शकत नाही. गृहीणीच्या स्वयंपाक घरातील बजेट सुद्धा राजकारणाशी जूळलेले आहे. तरीही स्त्रिया मात्र राजकारणात येवू इच्छित नाही.यासाठी अशा गोष्टी सर्वस्वी जबाबदार आहे. बाहेर काम करणाऱ्या महिलांकडे पूरूष केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात.मग ते कामाचे ठिकाण असो,राजकीय क्षेत्र असे किंवा सामाजिक क्षेत्र असो.या क्षेत्रात काम करणारे पुरूष हे विसरतात की,समोरची स्त्री ही आपल्या घरातील स्त्री सारखीच आहे.या स्त्रीचा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणूनच कि काय राजकीय क्षेत्रात वावरणारे लोक पाहा ते स्वतःच्या घरातील स्त्रियांना या क्षेत्रात शक्यतो येऊ देत नाहीत.आजवर अनेक दिग्गज नेते पुढारी आपण पाहिले आहेत परंतु त्यांच्या बायका मात्र कोणाच्याही ओळखीच्या नाही असे का ? प्रत्येक पक्षाला महिला पाहिजे असतात.महिलांच्या भरवशावर निवडून यायचे,त्यांच्या भरवशावर कार्यक्रम करायचे.प्रत्येक पक्षाची महिला आघाडी असते पण त्यासाठी मात्र दुसऱ्यांच्या घरातील महिला हव्या असतात.स्वतःच्या घरातील नाही.याचे कारण हेच आहे की, त्या लोकांना चांगलेच ठाऊक असते की,आपणच स्त्रियांना अशी वाईट वागणूक देतो.आपणच दुसऱ्या स्त्रियांवर अत्याचार करतो तर आपल्या स्त्रियांच्या बाबतीत ही हेच होईल म्हणून ते त्यांना घरातच सुरक्षित ठेवतात.दुसऱ्यांच्या घरातील महिलांच्या बाबतीत खूप घाणेरडे बोलत असतात.कारण नसतांना केवळ राजकीय उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नको नको त्या स्तराला जाऊन स्त्रियांचे चारित्र्यहनन करतांना दिसतात.स्वतःच्या घरातील महिलांच्या बाबतीत मात्र एक गोष्टही सहन करणार नाहीत असे हे लोक आहेत.
सर्वच महिला ह्या आपल्यासाठी सन्माननीय असल्या पाहिजे.तुमच्या अवतीभवती त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. तेव्हाच अनेक महिला अशा क्षेत्रात काम करण्यास पुढे येतील.आपले माननीय पंतप्रधान मोदीजी बाहेर देशात जाऊन आमच्या देशात किती छान चालले आहे,किती प्रचंड विकास झाला आहे,आमची जनता किती सुरक्षित आहे अशा बढाया मारतात. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळच आहे. ना जनता सुखी आहे ना देशातील महिला सुरक्षित आहे. महाराष्ट्रामध्ये ही निंदनीय घटना घडली, मणिपूरमध्ये वाद मोठ्या प्रमाणावर पेटला आहे. तेथील महिलांवर लज्जास्पद आणि अतिशय घृणास्पद अत्याचर सुरू आहे.शस्त्र म्हणून महिलांचा वापर केल्या जात आहे आणि यावर काही बोलायचे सोडून आपले पंतप्रधान देशाच्या विकासाच्या खोट्या बढाया मारत आहेत. हाच प्रकार जर दुसऱ्या पक्षातील नेत्याकडून घडला असता तर हेच सत्ताधारी तुटून पडले असते.परंतू आता सर्वांनी मौन साधले आहे. खरतर अशा घाणेरड्या लोकांना पक्षातून हाकलून द्यायला हवं.ठोस पावलं उचलायला हवी. तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल आणि बाकीचे सुद्धा यापासून काहीतरी धडा घेतील. अशा गोष्टी देशाच्या गौरवशाली इतिहासासाठी एक कलंकच आहे.भाजपाकडून आधीच इतर पक्षतोडीचा सपाटा सुरू असतांना आणखी या प्रकरणाने राजकारणाची पातळी अत्यंत खालावली आहे.राजकारणावरून आणि राज्यकर्त्यांवरून लोकांचा पूर्ण विश्वास उडाला आहे.अनेक राज्यात जातीय दंगली, धार्मिक दंगली मुद्दाम घडवून आणणे सुरू आहे. देशाची राष्ट्रीय एकात्मता तोडणे सुरू आहे.आधीच महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार या सर्व गोष्टींमुळे देशाची परिस्थिती रसातळाला गेली आहे.यापूढेही असेच सुरू राहिले तर आपला देश लवकरच पून्हा गुलामगीरीच्या खाईत गेल्या शिवाय राहणार नाही. सीमा प्रेमकुमार बोके, अंजनगाव सुर्जी.संकलन प्रांजली धोरण,मलकापूर.