शेषराव दाभाडे.तालुका प्रतिनिधी, नांदुरा
शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांच्या मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज सर्व जाती-धर्मांचा आदर करत असत. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सर्व जाती-धर्माच्या कित्येक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी योगदान दिले, प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.आपल्याला जर शिवकार्याचे खरे मर्म समजून घ्यायचे असेल तर, हे सर्व जाती-धर्माचे मावळे महाराजांसाठी, स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण द्यायला का तयार होते? याचा विचार करायला हवा. याचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी रयतेच्या राज्याच्या धोरणांमध्ये! कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज.छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी रयतेच्या राज्याचे धोरण:मनमानी महसूल वसुल करणार्या वतनदारांची मुजोरी मोडून काढली.शेतकऱ्यांची जमीन मोजली. त्यात किती पिक येईल याचा अंदाज काढला आणि त्यानुसार शेतसारा ठरवला.पिक कमी आल्यास शेतसारा कमी केला. दुष्काळप्रसंगी शेतसारा माफ केला. शेतकर्यांना शेतीसाठी मदत म्हणून बी-बियाणे, बैल, नांगर दिले.शेतकऱ्यांना कर्जे दिली, जी चार-पाच वर्षांत हप्त्यांनी फेडण्याची मुभा दिली. ज्यांच्या जमीन नव्हती त्यांना जमीन दिली.स्वराज्याच्या सैनिकांना महाराजांनी दिलेल्या आज्ञा:“रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये“सैन्यातील घोड्यांसाठी दाणा-वैरण रोख रक्कम देऊन खरेदी करा.कोणत्याही मोहिमेवर सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून न जाता शेताच्या बांधावरून जाण्याची आज्ञा दिली.स्वराज्याच्या कामासाठी लाकडाची गरज असल्यास त्याच्या धन्यास राजी करून योग्य मोबदला द्यावा.म्हणूनच शेतकऱ्यांचा कैवारी असलेल्या महाराजांना महात्मा जोतिबा फुले यांनी ‘कुळवाडी भूषण’ ही उपाधी दिली.यासोबतच,परकीय मालावर कर लावून स्वराज्यातील व्यापाऱ्यांना संरक्षण दिले.राज्यकारभार रयतेला आपला वाटावा यासाठी राज्यकारभाराची भाषा प्राकृत–जनतेची भाषा–केली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानात दिसते. त्यामुळे जर आपण स्वतःला महाराजांच्या विचारांचा वारसदार मानत असू तर महाराजांना अभिप्रेत असलेल्या आणि संविधानात प्रतिबिंबित झालेल्या लोककल्याणकारी राज्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यांच्या, सामान्य जनतेच्या, छोट्या व्यापाऱ्यांच्या राज्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. शिवकार्यातून प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी एकत्र येऊन यासाठी प्रयत्न करूया आणि आपल्या कृतीतून छत्रपती शिवरायांना अभिवादन करूया. जय जिजाऊ! जय शिवराय