जालना दि.25 :- कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा सिंचनाचा मुख्य उद्देश असून जालना जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने कामाची आवश्यकता असेल त्या ठिकाणी कामे कारण्याबरोबरच प्रलंबित असलेली कामे पाठपुरावा करून पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीसआरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषद अध्यक्षउत्तमराव वानखेडे माजी मंत्री तथा विद्यामान आमदार बबनराव लोणीकर,आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी, मुख्य अभियंता जलसंपदा विजय घुगरे, अधिक्षक अभियंता अभिजीत मेहत्रे, अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता रोहीत देशमुख आदींची उपस्थिती होती.
जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जालना जिल्ह्यात सिंचनाच्या अनुषंगाने आवश्यकता असलेली कामे करणे तसेच प्रलंबित असलेली कामे करण्याबाबत सर्व लोकप्रतिनिधीनी समवेत चर्चा करण्यात आली असून ही कामे वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी ज्या कामाच्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडविता येणे शक्य आहे त्या सोडविण्यात येऊन कामे पूर्ण करण्यात यावीत. तसेच ज्या अडचणी मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असतील त्यांची माहिती देण्यात यावी, त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, अशी ग्वाहीही मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिली.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील सिंचनाच्या असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मंत्री महोदयांना निवेदन देत गुंज बु. येथील जलसंपदा विभागाकडून बंधारा बांधणे, गल्हाटी धरण (बारसवाडा) येथील धरणामध्ये डावा कालवा अथवा शहागड बंधा-यातुन एक्सप्रेस कॅनालद्वारे अथवा पाईपलाईनद्वारे पाणी आणणे, रांजणीवाडी येथील बंधारा दुरुस्त करणे, जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील जमीन खरेदी विक्री आणि पाणी परवाना दरसुचीमध्ये आवश्यक ते बदल करणे, अंबड –कुंभार पिंपळगाव या रस्त्यावरील म.चिंचोली येथील तलावात जमीन संपादित झालेल्या शेतक-यांना मावेजा अदा करणेबाबत, कॅनॉल नजिकच्या सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी डिझेलासाठी यांत्रिकी विभागाला 10 कोटी रुपये निधी उपलब्ध करणे, खोडेपुरी ता. जालना कल्याणी नदीवर बंधारा व पुल बांधणे, तांदुळवाडी ता. जालना येथे नवीन बंधारा व पुल बांधण्याबाबत सविस्तर चर्चा करत ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी केली.
आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, जिल्ह्यात एकुण प्रकल्पात फक्त 25 टक्के क्षेत्र पाणी साठविण्यासाठी सक्षम आहे. उरलेल्या प्रकल्पांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे सांगत या प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना जिल्ह्यासाठी घाणेवाडी तलाव व जायकवाडी धरणातुन पाणी उपलब्ध होत असुन घाणेवाडी तलावाची साठवण क्षमता जिल्ह्याच्या लोकसंख्येला न पुरणारी आहे. तसेच जायकवाडी धरणाचे पाणी 90 ते 100 किलोमीटर अंतरावरुन येण्यास जास्त कालावधी व खर्च येत असल्यामुळे, हातवण येथील तलावची निर्मिती लवकरात लवकर करुन देण्याची व हातवण तलाव निर्मितीसाठी लागणा-या निधीची माहिती मंत्री महोदयांना सांगून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
आमदार नारायण कुचे यांनी सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्प आणि वाल्हा येथील प्रकल्प पाईपलाईनद्वारे जोडण्याची मागणी केली. सोमठाणा येथील अपर दुधना प्रकल्पात जलवनस्पतींची वाढ झालेली असुन त्या वनस्पती पोकलेन मशीनद्वारे काढण्यात याव्यात, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी मंत्री महोदयांना जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची माहिती देत नवीन तलाव निर्मितीसाठी लागणा-या निधीची सविस्तर माहिती तसेच तलाव निर्मितीमध्ये येणारे भुसंपादनासाठी आलेले अडथळे आदींबाबत पॉवरपॉईंटच्या माध्यमातून माहिती दिली.