गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निष्क्रियपणामुळे गावात पूर्णतः अस्वच्छता पसरली असून,गावातील सांडपाण्याने नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत.गावातील मुख्य रस्ते पूर्ण चिखलमय झाले असून, नाल्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे गावात डासांचे प्रमाण वाढले असून, सगळीकडे दुर्गधी पसरली आहे. हा प्रकार तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतच्या भोंगळ कारभारामुळे होत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिका-यांकडे निवेदनाद्वारे करण्यात येत आहेत. सध्या मलेरीया आणि डेंग्यूची साथ पसरत आहे. या आजाराने ग्रस्त आणि संशयीत असे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत.डेंग्यूसह विविध आजाराने गावकरी त्रस्त असून, गावात टायफॉइड, मलेरिया, सर्दी, खोकला हे आजाराचे प्रकार सर्रास सुरू आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून, गावात आरोग्य कर्मचारी फिरकत नसून गावात गोळ्या वाटप करणे, रुग्णांची नोंद घेणे हे काम बंद असून, अनेक दिवसांपासून आरोग्य कर्मचारी फिरकला नाही.गावात घाणीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावात स्वच्छता मोहिम राबवावी, नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे तसेच मलेरिया व डेंग्यूची लागण होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी व गावात धूरफवारणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या वार्डात नाल्यांची सफाई, गटारांची सफाई करुन घेणे आवश्यक असताना सदस्य सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. आधीच गेल्या दीड वर्षांपासून कोरोना आजाराने नागरिकांना हतबल केले आहेत त्यात आता मलेरीया आणि डेग्यूची साथ पसरत असल्याने नागरिक आणखीनच भयभीत झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
प्रतिक्रिया –
पावसाच्या वातावरणात मुळे संपूर्ण ठिकाणी किटकजन्य आजाराचे थैमान मांडले आहे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी आपण प्रत्येक ग्रामपंचायतीला सूचना दिल्या आहेत साचलेले जे डब्बे आहेत नाल्या आहेत ते वाहते करावे सामान्य जनतेमध्ये प्रसार करावा रात्री झोपताना अंगभर कपडे घालावे, सायंकाळच्या वेळेस घराच्या खिडक्या दरवाजे बंद ठेवावे व झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा ज्यांना काही ताप थंडी वाजून असेल सांधेदुखी असेल असे काही लक्षणे आढळल्यास शासकीय दवाखान्यात आपल्या रक्ताचे नमुने तपासणी करून घ्यावेत किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. प्रवीण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, तेल्हारा
प्रतिक्रिया –
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत डेंग्यू आणि मलेरियावर कोणत्याच प्रकारचे दुर्लक्ष झाले नाही पाहिजेत आणि आरोग्यासाठी कोणत्याच प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही जिल्हा परिषद
अनंत अवचार, जिल्हा परिषद सदस्य, अकोला
आरोग्य कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे प्रायव्हेट डॉक्टरांशी डायरेक्ट कनेक्शन हाय ना भावा ?
डेंग्यु, मलेरिया, चिकनगुनिया, सोबत विविध साथरोगांच्या आजारावर शासनाकडून नेहमीच सामान्यांची दिशाभूल होत होत असते त्यातच तालुकास्तरावर कर्मचारी, अधिकारी यांजकडून फक्त उडवाउडवीच्या उत्तरांशिवाय काहीच मिळत नाही. सामान्य, सामाजिक कार्यकर्ते याबाबत वारंवार निवेदन देतात, आंदोलनही करतात मात्र, लेखी उत्तरादाखल ऑन द स्पॉट’ त्यांना तसे काहीच दिसत नाही. अशातच या वाढत्या साथरोगांच्या काळात गावचावडीवर, फाट्यावर, नाक्यावर, चौकाचौकात आरोग्य कर्मचाऱ्यांचे नव्हे तर अधिकाऱ्यांचे प्रायव्हेट डॉक्टरांशी खरचं काही साटेलोट आहे का ? हा विषय ऐकावयास मिळतो. कारण आरोग्य कर्मचारी गावात येत नाही. मस्टरवर सही करुन पगारापुरतेच ते गावात दिसतात. आजारांवर शासनाच्या उपाययोजना, माहिती, सोबतच औषधीही उपलब्ध आहेत मात्र जनसंपर्काच्या नावावर फक्त डेटा मेंटेन दिसतो. परस्पर प्रायव्हेट डॉक्टरांकडे गेल्यानंतर १५० तपासणी फि सोबत औषधांचा खर्च यामुळे सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. याचाच आधार घेत प्रत्येक चौकात, चावडीवर, आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे प्रायव्हेट डॉक्टरांशी डायरेक्ट संबंध असल्याची चर्चा रंगत आहे.