आमदार कृष्णा गजबे यांनी दिले जिल्हाधिका-यांना निवेदन
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाघाने केलेल्या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला असुन सदर वाघांस मानवी रक्ताची चटक लागल्याने आणखीही अनेकांचा जीव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवावर उठलेल्या वाघांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात नरभक्षी वाघ तसेच बिबट्यांची दहशत कायम असुन नुकतेच वाघाने आरमोरी तालुक्यातील देलोडा खुर्द येथील इसमास तर बिबट्याने मार्कंडा कंसोबा येथील जंगलात गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील सात वर्षिय बालकाचा जीव घेतला तसेच आष्टी येथील बालकास जखमी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील वाघांनी एकुण १५ नागरीकांचा जीव घेतला असुन नुकतेच देसाईगंज तालुक्यातील बोळधा (गावगन्ना) ग्रामपंचायत अंतग॔त येणा-या रावणवाडी टोली येथील प्रभु नैताम यांच्या गोठ्यात बांधलेल्या तब्बल १५ शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना उघडकिस आली.यामुळे संपुर्ण परिसर दहशतीत वावरत असुन सदर बिबट कधीही मानवावर हल्ला करून जीव घेण्याची शक्यता लक्षात घेता सदर बिबट्यास तत्काळ जेरबंद करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारींना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.यावेळी आरमोरीचे भाजपा तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, पंकज खरवडे प्रामुख्याने उपस्थित होते.











