माजी आमदार तुकारामभाऊ बिडकर यांच्या प्रयत्नाला यश
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला शालेय अभ्यासक्रमात “कृषी विषयाचा” समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा निर्णयामुळे माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांच्या अथक प्रयत्नांचे यश मानले जात आहे. गेली 20 वर्ष बिडकर यांनी विविध माध्यमांचा वापर करून हा विषय सतत लावून धरला होता.
कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे हा अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय बुधवारी कृषिमंत्री दादा भुसे, शिक्षण मंञी वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
प्रा.बिडकर यांनी 2004 साली अकोला जिल्हा परिषदेचे कृषी सभापती असताना राज्यातील “कृषी सभापतींची परिषद” अकोला येथे घेऊन त्यात सर्वप्रथम ही मागणी केली होती. शालेय अभ्यासक्रमात कृषी हा विषय सक्तीचा करण्यात यावा असा ठराव ही या परिषदेत पारित करण्यात आला होता.
2005 मध्ये बिडकर यांनी विधानसभेत हा विषय लावून धरला होता, तत्कालीन कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आणि शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. शासनाने पुढे हा विषय राहुरी कृषी विद्यापीठाकडे सोपविला होता. विधापीठाच्या कुलगुरूच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास समितीने “कृषी विज्ञान” या अभ्यासक्रमाची शिफारस राज्य शासनाला केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
तत्कालीन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर , कृषी सचिव एकनाथ डवले यांनाही भेटून बिडकर यांनी सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. नुकतेच 6 जून 2021 रोजी बिडकर आणि प्रा.सदाशिव शेळके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन हा संपूर्ण विषय अवगत करून पाठपुरावा केलेली फाईल त्यांच्या सुपूर्द केली होती, दादा भुसे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला होता, त्यानंतर बुधवारी हा निर्णय जाहीर झाला.
दोन दशकांच्या मागणीला यश.
गेली दोन दशके आपण ज्या मागणीला लावून धरले होते ती मागणी उशिरा का होईना मान्य होऊन कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय या सरकारने घेतला याचा मला अतिशय आनंद झाला असुन , याबद्दल कृषिमंत्री दादा भुसे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम , शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चू कडू आणि कृषि सचिव एकनाथ डवले यांचे त्यांनी आभार मानले आहेत. ह्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशी मागणी आपण मंत्र्यांना भेटून करणार असल्याची प्रतिक्रिया प्रा.तुकाराम बिडकर यांनी दिली.
फोटो:
माजी आमदार तुकाराम भाऊ बिडकर











