अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर (दि. २५ॲागष्ट २०२१):-
स्थानिक डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन व मूल्य शिक्षण या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी विचारपीठावर प्राचार्य डॉ. किरण खंडारे प्रमुख वक्त्या लीना दीदी, संचालिका ब्रह्मकुमारीज् पातुर, प्रमुख उपस्थिती ब्रम्हकुमारी प्रभादेवी, सहसंचालिका ब्रह्मकुमारीज् पातुर, ग्रंथपाल प्रा. अतुल विखे, सांस्कृतिक समन्वयीका डॅा. दिपाली घोगरे उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. अतुल विखे यांनी केले. प्रास्ताविकात रक्षाबंधन व मूल्यशिक्षण या कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा परिचय
आणि कार्य सोबतचं उपस्थीत असलेल्या दोन्ही दीदींचा परिचय व त्यांचे कार्य आपल्या प्रास्ताविकेतुन थोडक्यात सांगीतले.यानंतर रक्षाबंधन व मूल्य शिक्षण या कार्यक्रमाला अनुसरुन प्रोफेसर डॉ. ममता इंगोले यांनी आपली स्वरचित कविता सादर केली. प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना ब्रम्हकुमारी लिना दीदी यांनी सांगितले की रक्षाबंधन व मूल्यशिक्षण यांचे अत्यंत समर्पक आणि जवळचे नाते आहे. रक्षाबंधना मागे अध्यात्मिक भावना आहे.रक्षाबंधन म्हणजे नुसतं बहिण-भावाच्या नात्यांचा सण नसून व्यक्तीने सामाजिक, नैतिक व मनाचे सुद्धा रक्षण करणे गरजेचे आहे. असे सांगितले. जुनाट रूढी परंपरा आणि मूल्यांना आपण दूर करून येणाऱ्या काळानुरूप मानवाच्या विकासासाठी सामाजिक सद्भावना जागृत करण्यासाठी आपल्याला नवीन मूल्यांचा विकास करून त्यांना आत्मसात करण्याची गरज आहे. सर्वांशी सहृदयतेने वागणे, कुठलाही भेदभाव न करणे या सर्वांचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन आहे.
हे सांगताना त्यांनी पुराणातील विविध दाखले दिले जसे देशाच्या काही भागात याला गुरु-शिष्य परंपरेचे प्रतीक मानले जाते. राजा दशरथ आणि श्रावण बाळ भेट प्रसंग रक्षाबंधनाशी जोडला जातो. प्राणवायू देणाऱ्या वृक्षांनाही आपण एक राखी बांधू शकतो. इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच शचीने एक रेशीम धागा बांधला. परिणामी इंद्र विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी आपल्या पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरु झाली. एकदा भगवान श्रीकृष्णाचा हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. द्रौपदीने लगेच आपल्या साडीच्या पदराचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. यामुळे रक्तस्राव थांबला. कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णानेच वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले, असे सांगितले जाते.
म्हनुन आपण सर्वांनी दृढ संकल्प करून रक्षाबंधन व मूल्यशिक्षणाचे महत्व सर्व दूर पोहोचविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ब्रम्हकुमारी लीना दीदी यांनी केले.त्यानंतर सहसंचालिका ब्रम्हकुमारी प्रभा दीदी यांनी राज योग मेडिटेशन द्वारे प्रात्यक्षिक सादर केले यामध्ये त्यांनी मनाला सकारात्मक उर्जा देणारे देणारे विचार व्यक्त केले. सकारात्मक विचारांची कास धरावी जेणेकरून बंधुभाव वाढेल अशी भूमिका स्पष्ट करतांना त्यांनी सांगीतले की,आज प्रत्येक व्यक्तिशी इच्छा असते की जीवनात सुख, शांती, समाधान, स्वास्थ्य असावे. परंतु आजच्या भौतिक जगात मनुष्य भौतिक साधन प्राप्त करण्याच्या मागे धावत आहे. भौतिक सुखाचा शोध घेत आहे. परंतु जेवढे भौतिक साधन, सुख, सुविधा उपलब्ध होत आहेत. तेवढा सुख शांती मनुष्यापासून दूर होत आहे व तो दु:खी होत चाललेला आहे. आपल्या वास्तविकतेपासून दूर होत आहे.मनुष्य अत्यंत बुध्दीवान प्राणी आहे. मनुष्याजवळ विवेकशक्ती आहे. सुदंर मन आहे, सुंदर विचार आहेत. परंतु मानवी मुल्यांचा ऱ्हास व नकारात्मकता वाढल्याने मनुष्याच्या जीवनात दु:ख, परेशानी, तणाव याच्यात वाढ होत चालली आहे. सुख शांती प्राप्त करण्यासाठी मनुष्याच्या जीवनात राजयोगाची नितांत आवश्यकता आहे.
असे प्रतिपादन केले.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ किरण खंडारे यांनी सांगीतले की, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीला, आणि बहिणीने भावाला दिलेले सुरक्षेचे बंधन होय. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा माउंट आबू ला एका आंतरराष्ट्रीय परिषदेमधील स्व अनुभव कथन केला. त्यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे कामकाज, व्यवस्थापन, शिस्त त्यांची विचारसरणी संपूर्ण मानव जातीच्या विकासासाठी कसे आवश्यक आहे. हे सांगतांना या संस्थेद्वारा चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग आपल्याला मिळतो व आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. जीवनामध्ये सकारात्मक रीत्या बदल घडवून आणू शकतो. यासाठी हे विचार आपण सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक समन्वयीका डॉ. दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.कुणाल विंचूरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.