तुझी इच्छा नसताना
वारंवार तुझ्या भेटीला येणं…
तुला फार त्रासदायक वाटत होतं नं
पण तुला त्रास देण्याचा माझा
कुठलाही हेतू नव्हता मुळी
ओढच एवढी तीव्र होती तुझ्या भेटीची
की मन मानेनाच!
आणि हो, माझा तरी काय दोष गं,
तो तुझ्या माझ्या प्रेमाचाच एक भाग होता
नित्य भेटण्याचा…
पण तू मुळीच समजून घेतलं नाही
माझ्या निरागस भावनेला
किती बदललीस तू,
पूर्वी कसं लागवी प्रेम करायचीस…
माझ्या जराशा इजेला घाबरून उठायचीस
आणि आजच्या भेटीत मात्र किती रागावलीस
अगदी पोटतिडकीने… लालबुंद होऊन
मी मात्र मुकाट्याने सहन करीत होतो
तुझ्या धारदार विषारी शब्दांचे वार!
खूप राग आला तुझा
पण तुझ्या अतीव प्रेमापुढे,
तो कुठे वितळला काही कळलेच नाही!
कालांतराने मात्र त्या रागाचा
मीच लक्ष ठरलो…
एका उद्धविघ्न मन:स्थितीत
स्वतःच्याच अंगावर निष्ठूरपणे,
घाव घालण्याची परिस्थिती निर्माण केली
अगदी हाडें तुटेपर्यंत… रक्तबंबाळही झालो…
आणि पडलो रुग्णालयाच्या अंथरूणावर
अकाली आला अर्ध्या वर्षाचा जीवघेणा एकांतवास!
हे असं का केलं मी, माहितेय तुला
एरवी माझ्याकडून तुला कुठलीही इजा होऊ नये रागात म्हणून,
मी स्वतःच जखम करवून घेतली!…
त्या वेदनादायी प्रसंगी…
तुझ्या भेटीची खूप गरज होती मला…
पण तू उलट्या काळजाची
त्या क्षणापासून भेटणे तर दूर,
साधे बोलणेही बंद करून टाकलीस
किती निष्ठुर वागलीस
मी दुःखात कोसळल्यावर!
आता बघ,
मी एखाद्या वेड्यागत जिवन जगतोय…
मुडदा पाडलेल्या प्रेमाच्या थडग्याजवळ,
निरंतर आसवें गाळीत बसतोय…
तुझ्या आठवांच्या गर्दीत,
चित्त हरवून!चित्त हरवून!!
—————————-
राजेश दे.बारसागडे
सावरगाव ता.नागभीड जि.
चंद्रपूर. मो : 8830961332
(महाराष्ट्र शासन “बालकवी”
पुरस्कृत कवी)