आसिफ खान शहर प्रतिनिधी ढाणकी
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या कालावधीला नुकतीच सुरुवात होत आहे. यामुळे जून-जुलै महिन्यात विद्यार्थी व पालकांची नवीन ऍडमिशन , नवीन शाळा , शाळेच्या सिल्याबस चे पुस्तके, गणवेश यासाठी अक्षरशः तारांबळ उडत आहे. सद्यस्थितीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी सगळीकडे जोर धरला आहे. प्रत्येक पालकाला सुद्धा वाटतं माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावा. मग त्या शाळेची अव्वाच्या सव्वा फी भरायला सुद्धा पालक तयार होत आहेत.अगदी कठीण परिस्थिती असली तरीही, पालक कितीही अडचणीत असला तरी मुलाला इंग्रजी माध्यमाचे शिक्षण द्यावं याकरिता धडपड करताना दिसत आहे.परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळा अव्वाच्या सव्वा फी घेऊन सुद्धा एवढ्यावरच न थांबता, या पालकांना अजूनही कशी आर्थिक चोट बसेल ? एवढाच प्रयत्न करताना दिसत आहे. बाकी शिक्षणाच्या नावाने नुसती बोंबाबोंब असल्याची काही पालक ओरड करीत आहेत. विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला की, शाळेचा गणवेश, तो सुद्धा एक न घेता दोन गणवेश तसेच संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रमाचा पुस्तकाचा संच हा त्या शाळेतूनच विकत घ्यावा लागेल. तो इतरत्र कुठे भेटणार नाही. आणि कोणत्या कोणत्या शाळेत तर शाळेने ठरवून दिलेल्या, बाजारातील दुकानांमध्येच ह्या वस्तू विकत घ्याव्या लागतील. त्या सुद्धा इतरत्र कुठे भेटणार नाही. अशी वास्तविक परिस्थिती आहे. मग शाळेने ठरवून दिलेले दुकानदार सुद्धा अव्वाच्या सव्वा भावाने गणवेश व पुस्तकांची विक्री करतात. तर काही शाळा स्वतःच शाळेमध्ये दुकान मांडून विक्री करतात. ती सुद्धा अव्वाच्या सव्वा दरानेचं. शिवाय विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूलबस चे वार्षिक भाडे वेगळेच, आणि वर्षभराची शिक्षणाची फीस ३० ते ४० हजार. एवढं होऊन सुद्धा त्या विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस यासाठीची वेगळी फी , म्हणजे पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याला जवळपास ७० ते ८० हजार वार्षिक फी पालकाला भरावी लागत आहे. एवढं करून सुद्धा आपल्या पाल्याला खरंच उच्च दर्जाचं शिक्षण मिळत असेल का ? एवढा खर्च पालक करत आहेत त्याचं आउटपुट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतून किती प्रमाणात बाहेर निघत आहे ? याचा कुठेतरी पालकांनी विचार करावा. इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे सद्यस्थितीत शाळेच्या संचालकांचा भव्य दिव्य व्यवसाय म्हणावा लागेल. सद्यस्थितीत शिक्षण हे शिक्षण न राहता त्यास व्यावसायिक रूप प्राप्त झाल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत. आणि यात विनाकारण चेपला जातोय तो विद्यार्थी आणि पालक. शाळा संचालक मात्र यातून भरमसाठ कमाई करून स्वतःचे घर ऐटीत चालवताना दिसत आहेत.शिक्षणाच्या नावावर सुरू करण्यात आलेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा व्यवसाय, जाहिरातबाजी, बॅनरबाजी , शाळेची बिल्डिंग या गोष्टींवर पालकांनी लक्ष न देता, त्या शाळेतील शिक्षण किती आनंददायी व विद्यार्थ्यांच्या लक्षात बसणारे आहे, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं. तरच भविष्यात आपला पाल्य उच्च शिक्षणाबरोबर देशाचा चांगला नागरिक बनेल असा सूर काही प्रतिष्ठित लोकांकडून निघत आहे. बॉक्स :आता जि.प. च्या शाळा सुद्धा डिजिटल होत आहेत. येथील शिक्षक सुद्धा सर्वांशी स्पर्धा करुनचं निवडले जातात.त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलंच शिक्षण मिळतं. मात्र यासाठी पालक आणि शिक्षक दोघांनाही आपल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव असणं तितकच अत्यावश्यक आहे.ढाणकी परिसरात जि.प. च्या अशा खूप छान शाळा आहेत. तेथील शिक्षक सुद्धा उच्चशिक्षित आहेत.उदाहरणार्थ : जि.प. उच्च प्राथ. शाळा बिटरगाव (बु.) आणि जि.प.प्राथ. शाळा नवी आबादी, विडूळ . पालकांनी ह्या शाळा व येथील शिक्षकांना भेट द्यावी. तेव्हाचं खरं शिक्षण, शिक्षक आणि शाळा सर्वांना कळेल.


