अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी :- यवतमाळ जिल्ह्यातील केवळ आठ तालुक्यात 16 महसूल मंडळात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. विशेषतः या मध्ये घाटंजी तालुका वगळण्यात आला आहे. या वर्षी जुन मध्ये उशिरा सुरू झालेला पावसानंतर सतत अतिवृष्टी व पुन्हा पावसाचा झालेला खंड या मुळे घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पुर्णपणे उध्वस्त झाला असून कापूस पिकाची दिवाळीच्या सना सोबत उलंगवाडी झाली आहे. तर सोयाबीन पिकाचा एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा आला आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे 60 टक्के उत्पादन घटून केवळ 40 टक्के उत्पादन होत आहे. आणि या दुष्काळी परिस्थिती मध्ये प्रशासनाने 50 टक्के च्या वर आनेवारी काढली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन तर घटले, पण विकायला जातो म्हटले तर भाव नाही. अशा दृष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. मात्र शेतकऱ्यांची प्रशासन थट्टा करीत असून महसूल आणि कृषी विभागाने कोणत्या तिसऱ्या डोळ्याने सर्व्हे केला या बाबत शेतकऱ्यांना माहीत नाही. पण हा शेतकऱ्यांवर हा प्रचंड अन्याय आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. शेती करणे म्हणजे कर्जबाजारी होणे, असा समज शेतकऱ्यांमध्ये दृढ होत आहे. शेती परवडत नाही म्हणून अनेक कुटुंबे दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहे. ही कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची झालेली प्रतारणाच म्हणावी लागेल. शेतकरी सततच्या नापिकीने हताश झाला आहे. परंतु राज्यकर्ते महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी गरज नसलेल्या भानगडीत गुंतले आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांची चेष्टा करित आहे. 25 टक्के अग्रीम रक्कम दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पडेल ही शासनाची घोषणा फसवी निघाली आहे. घाटंजी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार ते पांच पांच हजारांपर्यंत असे तुटपुंजे पैसे पडत आहे. विमा कंपन्याचे राज्यकर्ते बटिक झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा वाली कुणीच नाही, असे चित्र पहायला मिळत आहे. आम्ही शेतकऱ्यांचे तारणहार असल्याचे दाखवायचे, अन दुसरीकडे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचा अंत पहायचा, हेच सुरू आहे. शेतकऱ्यांच्या कैवाराची भाषा करणारे सरकार दरवर्षीचे हे दृष्टचक्र थांबवायला का पुढाकार घेत नाही. हाच खरा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रशासनाच्या मनात काही संवेदना शिल्लक असेल तर शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे समोर आणावे, व घाटंजी तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ द्यावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले 50,000 हजार रुपये तात्काळ द्यावे, अन्यथा घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते मोरेश्वर वातीले यांनी दिला आहे.