सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : ३१ ऑक्टोबर २०२३ बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत आणि शहरांमध्ये मराठा समाजबांधव आरक्षणासाठी शांततेत उपोषण आणि आंदोलन करत असताना बीड जिल्ह्यात मात्र अनुचित घटनांना वाव फुटल्यच्या घटना समोर येत आहेत.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विविध माध्यमांतून मराठा बांधवांचे उपोषण आंदोलने चालू आहेत. परंतू सत्ताधारी सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने आणि मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्याने मराठा बांधव आक्रमक झाल्याचे चित्र बीड जिल्ह्यात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार संदिप क्षिरसागर यांच्या बीड मधील राहत्या घराला संतप्त जमावाने दगडफेक करत आग लावली त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याही घरावर दगडफेक करत आग लावली. वडवणी तालुक्यात कडकडीत बंद पाळत परळ – बीड महामार्गावर लाकडे जाळून रस्ता बंद करण्यात आला. तर आष्टीचे तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या शासकीय वाहन क्र.एम.एच.२३ एफ १००३ या वाहनास अज्ञात व्यक्तींनी आग लावली बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा बंद असल्याने प्रवाशांचे आणि सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.अशा अनेक घटनांनी आणि प्रकारांनी बीड जिल्हासह महाराष्ट्र होरपळत असताना सत्ताधारी सरकार मात्र गप्प आहे.