मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
आज प्रत्येक गावामध्ये तीस वर्ष वय संपून गेलेले कित्येक तरुण अविवाहित असल्याचे दिसून येत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही काळापूर्वी मोठ्या प्रमाणात मुलींची भ्रूणहत्या, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींनी घेतलेली झेप. काही काळापूर्वी हुंडा या व्यवस्थेने सर्वसामान्य व्यक्तींना भेडसावून टाकलं आणि मग प्रत्येक व्यक्तीला मुलगी नको असं वाटायला लागलं आणि याच माध्यमातून मुलींची मोठ्या प्रमाणात भ्रूण हत्या झाली,त्याच गोष्टीचा पडसाद आज समाजामध्ये दिसून येत आहे, त्याचप्रमाणे मुलांच्या तूलनेत मुलींचे शिक्षण जास्त झाल्याने मुलींच्या आणि मुलींच्या पालकाच्या अपेक्षा विवाह संदर्भामध्ये मुलगा नोकरीवालाच असावा, मुलगा शहरांमध्येच असावा,आशा अपेक्षा वाढत गेल्यामुळे पर्यायी खेड्यातील मुलांचे विवाहाच्या संदर्भात भवितव्य धोक्यात आले आहे, म्हणजे शहरातील मुलं अगदी सुरक्षित आहेत असेही नाही, कारण मुलीच्या वडिलांना फक्त शहर आणि नोकरी असूनही चालत नाही.त्याच्याही पलीकडे त्यांना आजच मुलांकडे बंगला, गाडी यासारख्या सर्व लक्झरी सुविधाही असाव्या अशा अपेक्षा असतात. अलीकडे तर मुलगा एकटा असावा अशाही लोकांच्या अपेक्षा आहेत. आई वडील कमावते असावेत किंवा पेन्शन धारक असावेत त्यांच्याकडे मेडिकल सुविधाही असाव्यात आशा ही मुलींच्या पालकांच्या अपेक्षा असतात. म्हणून मुलं शहरातील आणि खेड्यातील या दोघांचेही विवाहाच्या संदर्भात भवितव्य धोक्यात आहे.
मग आता आपल्याला वाटेल की मुलींचे भवितव्य या काळामध्ये विवाहाच्या संदर्भात खूप उज्वल आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर मी म्हणून अजिबात नाही असे देईल. कारण वरील काही समस्या कडे पाहून मुलींच्या आई वडिलांचा एवढा मोठा गैरसमज होऊन बसलेला आहे की, आता आम्हाला मुलींचे लग्न करण्यासाठी कोणाच्याही पाठीमागे पळावे लागणार नाही, आमच्या पाठीमागे मुलीसाठी एक मोठी लाईन लागलेली असेल, बऱ्याचश्या मागण्या या काळामध्ये मुलींसाठी होतातही आणि मात्र या सगळ्या परिस्थितीकडे पाहिल्यानंतर मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा यापेक्षा जास्त वाढत गेलेल्या असतात, आणि मग ते निर्णय घेण्याऐवजी प्रत्येक येणाऱ्या स्थळांमध्ये उनिवा शोधत असतात. पर्यायी दुसऱ्यांच्या उनिवा शोधत असताना त्यांना आपल्या मुलीचे विवाहाचे वय निघून गेले हे कळतच नाही, मग मोठी मुलगी व तिच्या मागील अजून एक मुलगा व मुलगी हे सारे अविवाहित असतात. जेव्हा समाज व नातेवाईक यांना टोचायला सुरुवात करतात, मुलगी पस्तीस वर्षाची झाली लग्न का करत नाहीत. त्यावेळेस हे आई वडील जागे होतात मात्र त्यादिवशी यांच्या हातातून वेळ गेलेली असते. त्यावेळेस मात्र मुलींची कमी असतानाही, यांची मुलगी खूप शिकलेली असूनही, मोठे पॅकेज असूनही, यांच्या मुलीशी लग्न करण्यास कोणी तयार होत नाही. म्हणून आज फक्त मुलगा किंवा मुलगी नाहीतर पूर्ण विवाह व्यवस्था धोक्याच्या भवऱ्यात आहे.
याच्याही पलीकडे विवाह झाल्यानंतरही विवाह टिकवणे ही प्रक्रिया अतिशय किचकट झालेली आहे. दिवसेंदिवस भारतीय संस्कृतीची कमतरता व पाश्चात्य संस्कृतीने केलेले अतिक्रमण यामुळे घटस्फोटाचे मोठे प्रमाण वाढलेले आहे. अतिशय अल्प कारणावरून आणि पालकांच्या मध्यस्थीमुळे घटस्फोटाचे मोठे प्रमाण वाढलेले आज समाजामध्ये दिसून येत आहे. अतिशय बारकाईने जर अभ्यास केला तर घटस्फोटामध्ये दोन्हीही पालकांचा जास्त सहभाग दुसरे महत्त्वाचे आणि मोठे कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे मोबाईल आणि म्हणून विवाह जमणे व जमवणे जेवढे किचकट झालेले आहेत तेवढेच विवाह टिकवणे ही किचकट झालेले आहे……. श्री संजय चंद्रभान डोंगरे पाटील यश फाउंडेशन अहमदनगर











