अलाहाबाद : विवाहाच्या संबंधात ‘सोलेमनीज’ या शब्दाचा अर्थ ‘योग्य समारंभांनी आणि योग्य रीतीने विवाह साजरा करणे’ असा होतो. सप्तपदी समारंभ आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह वैध ठरत नाही, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नोंदवले आहे. पतीने घटस्फोट न घेता दुसरा विवाह केल्याचा आरोप पहिल्या पत्नीने केला होता. बेकायदा दुसरा विवाह करणार्या पतीला कायदान्वये शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका पत्नीने अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी निरीक्षण नोंदवले की, “विवाहाच्या संबंधात ‘सोलेमनीज’ या शब्दाचा अर्थ ‘योग्य समारंभांनी आणि योग्य रीतीने विवाह साजरा करणे’, असा होतो. जोपर्यंत लग्न योग्य समारंभ आणि योग्य रीतीने साजरा केला जात नाही ताेपर्यंत त्याला विवाह असे म्हणता येणार नाही. विवाह वैध विवाह नसेल तर कायद्याच्या दृष्टीने तो विवाह नाही. ‘सप्तपदी’ समारंभ हिंदू कायदा वैध विवाहासाठी आवश्यक घटकांपैकी एक आहे.” तसेच या प्रकरणी न्यायालयाने संपूर्ण कार्यवाही रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.


