शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सोनपेठात आढावा बैठक : घटक पक्षांबरोबरसुध्दा गुफ्तगू.
परभणी : दि.03 भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणूक प्रमुख या नात्यातून ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वीच बोर्डीकर यांची परभणी लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हाच या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भूवया उंचावल्या. काही प्रतिक्रिया सुध्दा उमटल्या. परंतु, बोर्डीकर यांनी या नियुक्तीसह आगामी लोकसभा निवडणूकी संदर्भात ओळीनेसुध्दा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. परंतु, रविवारी लोकसभा निवडणूक प्रमुख या नात्याने मतदारसंघाचा दौरा सुरु केला. त्यासाठी बोर्डीकर यांनी सोनपेठ तालुक्यास प्रथम प्राधान्य दिले. त्याप्रमाणे ते रविवारी सोनपेठात दाखल झाल्या बरोबर त्यांचे बालाजी मंदिर संस्थान च्या सभागृहात स्थानिक व जिल्ह्यातील नेते मंडळींनी जोरदार स्वागत केले.विशेषतः माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, ज्येष्ठ नेते रमाकांतराव जहागिरदार, विलास बाबर, भागवतराव बाजगीर, उध्दवराव नाईक, सुरेश भुमरे, रंगनाथ सोळंके, पांडुरंगराव नखाते, विकास मगर, गणेश हांडे, पांडुरंग गवाडे, भागवत बाजगीर, सौ. मंगल मुदगलकर, यांच्यासह अन्य उपस्थित होते.याप्रसंगी बोर्डीकर यांनी सोनपेठ तालुक्यांतर्गत बुथ रचनेचा आढावा घेतला. निवडणूकीच्या दृष्टीकोनातून बुथ रचना सर्वार्थाने सक्षम असणे हे गरजेचे आहे, असे नमूद केले. त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचा आढावा सादर करते वेळी त्यांचे हे कार्य कार्यकर्त्यांनी सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे, असा आग्रह धरला. आगामी लोकसभा निवडणूकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीने सर्वार्थाने विचार विनिमय सुरु केला आहे. पार्टी जो आदेश देईल, त्याप्रमाणेच आपणा सार्यांना काम करावयाचे आहे, असे नमूद करीत परभणी लोकसभा मतदार संघात निश्चितच परिवर्तन दिसेल, भाजपाचाच खासदार निवडून येईल, असा विश्वासही व्यक्त केला. घटकपक्षातील नेते मंडळींबरोबर गुफ्तगू ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचे महायुती तील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व रासपच्या नेते मंडळींनीही बाजार समितीच्या आवारात स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी बोर्डीकर यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेनेचे नेतेमंडळींची आवर्जून उपस्थिती होती. विटेकर यांनी बोर्डीकर यांच्यामुळेच आपण बाजार समितीत सभापतीपदी विराजमान झालो असल्याची आठवण करुन दिली. यावेळी भाजपाचे स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूका सर्वांच्या सहकार्याने, ताकतीने लढूया, असा संकल्पसुध्दा यावेळी नेतेमंडळींनी व्यक्त केला.