हिंगोली : “नको तिथे जात काढू नये, पैसा खाताना जात आठवत नाही अन् कमजोर पडायला लागले की जात आठवते हा नालायकपणा आहे,” असे म्हणत दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कृतीचे समर्थन केले. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडून मित्र म्हणून जवळ घेत फजलखानासारखी मिठी मारली जाते, हे योग्य नसल्याचे म्हणत भाजपच्या नेत्यांवरही तिखट शब्दात टीका केली. आपले जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे. आमदार बच्चू कडू यांना आवरा असे भाजपाचे प्रदेशाध्यक्षच म्हणाले होते. एकीकडे सत्तेत सहभागी होण्यासाठी फोन करतात अन् त्यानंतर अशी भूमिका घेणे योग्य नाही. आपण ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्या सोबत प्रामाणिक राहिले पाहिजे, असा सल्ला यांनी भाजपाला दिला. आमच्या सोबत दगा फटका होऊ शकतो तर जनतेसोबतही होऊ शकतो. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होईल. मित्र म्हणून जवळ घ्यायचे अन् अफलजखानासारखी मिठी मारायची हे चांगले नाही, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी भाजपाला दिला. वाघनखे हा विषय किंवा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांना नखेच राहिली नाहीत त्यांनी वाघनखांबद्दल बोलू नये आपल्याला किती नखे आहेत हे पहावं, अशा शब्दात शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाण साधला. नांदेड येथील प्रकरणाबद्दल बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, “नको तिथे जात काढू नये. पैसे खाताना जात आठवत नाही अन् कमजोर पडायला लागला की जात आठवते हा नालायकपणा आहे. आपण घर जसे चांगले ठेवतो तसेच रुग्णालय देखील चांगले ठेवायला हवे. रुग्णालयात झाडू मारल्यानंतर बेकार वाटत असेल तर त्या घाणीत येणार्या रुग्णांना काय वाटते याचे तेथील अधिष्ठाता यांना वाईट वाटायला नको का? असा सवाल करीत त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.