सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी, बीड
बीड : दि. २० ऑगस्ट २०२३ आगामी लोकसभा काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात होत असलेले बदल पहाता बीड जिल्ह्यातील राजकीय पक्षांची परिस्थिती काही वेगळी नाही राहिली. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट निर्माण झाले आहेत.शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे. गेल्या काही दिवसांत बीड जिल्ह्यातील राजकीय पटलावर झालेले फेरबदल पाहून भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या जिल्ह्यातील नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची परिस्थिती बिकट झाली असून पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या पेचात सापडले आहेत. नेमके जावे कोणासोबत परळी वैजनाथ मतदार संघाचे अजित पवार यांच्या गटातील धनंजय मुंडे सोबत का बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या गटाचे संदिप क्षिरसागर यांच्या सोबत हा संभ्रम निर्माण झाला असून जिल्ह्यातील जनताही बीडच्या ढिसाळ आणि भ्रष्ट नेत्यांकडे पाठ फिरवत आहे. मागिल काही वर्षांत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस असताना बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना कधीच न्याय मिळाला नसल्याचे नागरिकांचे मत येत आहे. एक मेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात जिल्ह्यातील अनेक योजना फक्त कागदावरच राबविण्यात आल्या. शासनाच्या योजना राजकारणात सक्रिय असलेल्या आणि जवळचे नेते आणि कार्यकर्ते यांना देऊन मोठे करण्यात आले. असे अनेक आरोप जनतेतून होत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील भ्रष्ट राजकारणाने येथील सुशिक्षित बेरोजगार, कामगार, अल्पभूधारक शेतकरी वर्ग, रोजंदारीवर आपली उपजीविका भागवणारे सामान्य नागरिक मात्र गेल्या काही वर्षांत होरपळून निघाले आहेत. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठा बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्रातील राजकारणातील महत्वाचा असलेला परळी वैजनाथ मतदार संघ पुन्हा एकदा १७ ऑगस्ट २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी बीड या ठिकाणी घेतलेल्या स्वाभिमान सभेत चर्चेत आला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील उपस्थित जनसमुदाय पाहून याचा फटका भाजपाच्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना बसणार का नाही हे मात्र येणार काळच ठरवेल. दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत परळी वैजनाथ मतदार संघातील जनक्रांती सेनेचे संस्थापक बबन गित्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला.परळी मतदार संघातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून जनक्रांती सेनेचे कार्यकर्ते यावेळी बीड येथे उपस्थित होते.कधीकाळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक असलेले बबन गित्ते यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने बीड बीड जिल्ह्यातील आणि परळी वैजनाथ मतदार संघातील जनतेला तिसरा पर्याय मिळाला आहे. चर्चेला उधाण आले असून जनक्रांती सेनेचे संस्थापक बबन गित्ते यांना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे अशी चर्चा परळी वैजनाथ मतदार संघात चालू असून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परळी मतदार संघातील परिस्थिती दोघात तिसरा सगळ विसरा अशी होणार आहे.


