लक्ष्मीकांत राऊत,
शहर प्रतिनिधी,परतूर
परतूर – तालुक्यातील खांडवी ग्रामपंचायतने सरपंच अशोकराव बरकुले यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनी घेतलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पास केला. या ठरावाचे कौतुक तालुकाभर झाले, मात्र पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे सोडले तर प्रशासनाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला विशेष महत्व दिलेले पाहायला मिळाले नाही.
ग्रामीण भागात दारूच्या व्यसनमुक्ती अभियानावर वर शासन करोडो रुपयांचा निधी खर्च करून वेगवेगळे व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवत असते. शासनाचा दारूबंदी विभाग याचसाठी काम करत असतो.पण तो जनतेला कधी हे काम करतांना दिसत नाही हा भाग वेगळा ! असला तरी जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी कार्यालय ही यासाठी प्रयत्न करत असल्याचे दाखवत असतात. मग स्वच्छेने खांडवी सारखे गाव दारूबंदीसाठी ग्रामसभेच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पाऊल उचलून एक क्रांतिकारी निर्णय घेते. गाव पातळीवर ग्रामसभेत अशा प्रकारचा दारूबंदीचा ठराव घेण्याचे धाडसी काम करत असतांना प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी या व्यसनमुक्ती कामाची दखल का घेत नाही असा प्रश्न या निमित्ताने पडलेला आहे.सरपंच अशोकराव बरकुले व त्यांचे सहकारी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेत गावात ग्रामसभेत दारूबंदी ठराव घेऊन व्यसनमुक्ती चळवळीला बळ दिले. दारूबंदीचा ठराव मांडून तो ग्रामसभेत पास करून घेतला. ग्रामस्थांच्या वतीने घेतलेले हे एक अतिशय मोठे पाऊल म्हणावे लागेल . त्यांच्या या समाजसेवी कामाचे कौतुक प्रशासनाच्या वरीष्ठ अधिकारी वर्गाच्या माध्यमातून केले जाणे अपेक्षित होते. दारूबंदी अधिकारी,मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने याचं कौतुक केलं असते तर इतर ग्रामीण भागात प्रेरणा देणारे ठरले असते. माहितीप्रमाणे परतुर पोलीस स्टेशनचे पीआय एम टी सुरोशे यांनी मात्र गावकऱ्यांच्या या निर्णयाचे गावात जावून अभिनंदन केले, हे जर सोडले तर तालुक्याचा प्रमुख असलेल्या तहसीलदार , गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यासारख्या वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही. राजकीय स्तरावर देखील या ठरावाचे कौतुक झाल्याचे आढळून आले नाही. यापूर्वी ही दारूबंदीच्या ठराव दैठना खुर्द व आणखी एका ग्रामपंचायतीने घेतला होता त्याचं कौतुक ही वरीष्ठ अधिकारी वर्गाने केलेले नव्हते. दारूबंदी सारख्या विषयावर प्रशासना च्या अधिकारी वर्गाची ही भूमिका निश्चितच आश्चर्य चकित करणारी समजली जात आहे.


