सईद कुरेशी
शहर प्रतिनिधी, नंदूरबार
नंदुरबार:नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी नंदुरबार जिल्हा भेटीसाठी येणार आहेत. सदर भेटी दरम्यान ते आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा, गुन्हे आढावा यांचेसह नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये केलेल्या कारवाया पाहून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर पाटील यांनी अंमली पदार्थ मुक्त जिल्हा होवू शकेल अशी सूचना मांडली होती. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी कारवाया करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या मोहिमेचा शुभारंभ दिनांक 1 मार्च 2023 रोजी झाला. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा तसेच केलेल्या कारवायांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे. याच दिवशी नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थ मुक्त जिल्हा घोषीत करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अंमली पदार्थांची शेती, अंमली पदार्थ बाळगणे, त्याची वाहतूक करणे, त्याची विक्री करणे यावर यापूर्वीच प्रतिबंध करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे पालन न करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द् छापा कारवाई करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.दिनांक 1 मार्च 2023 रोजी पासून सुरु करण्यात आलेल्या अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या उपक्रमादरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने गांवोगावी शाळा / महाविद्यालयात जावून अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्याचे कार्यक्रम राबविण्यात आलेहोते. तसेच जिल्हा घटकातील सर्व ग्रामपंचायतींकडून स्वयंस्फूर्तीने अंमली पदार्थ विरोधी ठराव केलेले आहेत. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा हा उपक्रम यशस्वी व्हावा त्याची माहिती जिल्हा घटकातील तळागळापर्यंत व्हावी याकरीता पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गाव पातळीवर पोलीस पाटील, गावातील नागरिक तसेच शाळा महाविद्यालय येथे आज पावेतो एकुण 206 बैठका घेण्यात आल्या आहेत. उपक्रमाबाबत जनजागृती व्हावी याकरीता पोस्टर्स व बॅनर्स यांचे मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. अंमली पदार्थ याबाबत गोपनीय माहिती पोलीस दलास व्हावी याकरीता 9022455414 हाहेल्पलाईन क्रमांक
कार्यान्वीत करण्यात आला असून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संबंधीत पोलीस ठाण्यांकडून तातडीने दखल घेवून कारवाई करण्यात येते. तसेच तक्रारदार यांची माहिती गोपनीय ठेवली जाते. दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील कवायत मैदानावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्याचा कार्यक्रम होईल. सदर कार्यक्रमासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी यांचेसोबत विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक तसेच सरपंच, पोलीस पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तयार करण्यात आलेला अंमली पदार्थ विरोधी शॉर्ट फिल्मचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर बालविवाहांना प्रतिबंध करणेतसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 8 मार्च 2023 रोजी “ऑपरेशन अक्षता” हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. “ऑपरेशन अक्षता ” या उपक्रमाचा महत्वाचा भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून बालविवाहविरोधी ठराव एकमताने मंजूर करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलास सहकार्यकेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचांचा प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे . तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे प्रातिनिधीक स्वरुपातील ठराव प्रमुख अतिथी यांना सुपूर्त करणार आहेत.
तसेच दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे जिल्हा पोलीस दलाकडून उघडकीस आणलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यासारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल व नागरिकांचे गहाळ / हरविलेले मोबाईल असा एकुण सुमारे 55 लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ तक्रारदारांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते परत करण्यात येणार आहे. तसेच अंमली पदार्थ मुक्त जिल्हा संदर्भातील बॅनरचे उद्घाटनही नंदुरबार शहरातील नेहरु चौक याठिकाणी होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा / महाविद्यलयातील विद्यार्थी व विद्यार्थीनींना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, अंमली पदार्थ मुक्त जिल्हा या कार्यक्रमासाठी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.