ग्राहकांना दहा रुपयांच्या भुर्दंड;दरमहा लाखोंची अप्रत्यक्ष कमाई….
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 25 : वीज रीडिंग बाबत अनियमतता आणि बिल उशिराने देण्यासंदर्भात 15 दिवसात सुधारणा करण्याचे आश्वासन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांनी दिले होते. मात्र, तरीही शहाद्यात बीलांचे वाटप शेवटच्या क्षणी करण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येकी दहा रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. यातून शहरातून वितरण कंपनी ग्राहकांकडून सुमारे 2 लाखाच्यावर लूट करीत असल्याचे दिसून येत आहे. ही आकडेवारी शहरापूरती आहे. विभागात अन्य 26 हजार ग्राहक आहेत. अश्या सर्वांना मागणी बिल उशिरा मिळाले असेल तर फक्त एका महिन्याची होणारी लयलूट साडे चार लाख पर्यंत होते. वर्षानुवर्षे कंपनी विलंब शुल्कच्या नावाने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असल्याचे दिसून येत आहेत. शहादा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना गत तीन महिन्यापासून डिजिटल वीज मीटरद्वारे वीज बिल दिले जात आहे. मात्र अनेक ग्राहकांना रीडिंग उपलब्ध नाही असा शेरा मारून सरासरी वीज बिल दिले जात आहे. वीज बिल वाटपात हेतूता विलंब व अनियमितता, काही ग्राहकांना वीज बिल वेळेवर न भरल्याचे कारण सांगून कनेक्शन कट करण्याची भीती दाखविली जात आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती उपकरणांचे होणारे नुकसान, शहरीसह ग्रामीण भागातील डीपीवर दाब नियंत्रक यंत्र बसविण्यातील चालढकल, व्यावसायिक ग्राहकांना सरासरी वीज बिल आकारणी, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढ झाली असून विविध करांच्या नावाखाली तसेच सुरक्षा अनामत रकमेच्या नावाने भरमसाठ वीज बिल पाठविले जात आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी दि. 27 मे रोजी शहरातील तक्रारदरांच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, विजय चौधरी, पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर, रुपेश जाधव आदींच्या शिष्टमंडळाने वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांची भेट घेतली होती. तसेच वीज बिलासह अन्य समस्यां संदर्भात येत्या महिन्याभरात वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा न झाल्यास कायदेशीर आंदोलन उभारण्याच्या इशारा माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर व सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला होता. यावेळी शहरात आरएफ मीटर (रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर) बसविण्यात आले असून एजन्सी मार्फत डिजिटल रीडिंग घेतले जाते. संबंधित एजन्सीकडून रीडिंग बाबत अनियमतता होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती मान्य केली. ग्राहकांच्या तक्रारींची कंपनीकडून दखल घेण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात रीडिंगसह वीज वितरण कंपनीच्या बाबतीत असलेल्या तक्रारी निकाली काढण्यात येतील. ग्राहकांनी वीज वितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन श्री. झटकरे यांनी केले होते. त्यांच्या आश्वासनाला एक महिना पूर्ण झाला झाला तरी वितरण कंपनीच्या कामकाजात तसूभरही फरक पडलेला नाही. अनेक वीज ग्राहकांना सरासरी आकारणीची बिले देण्यात आली आहेत. त्यावर कहर म्हणजे नियमित बिल भरण्याची अंतिम तारीख 24 जून असतांनाही त्याच दिवशी बिळांचे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. घरातील असंख्य कर्ती व्यक्ती कामकाज सोडून ऐनवेळी वीज बिल भरायला जावू शकत नाही हे माहीत असताना जाणूनबुजून असे वाटप केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सर्वांना 25 जूननंतर बिल भरणा केला असता दहा रुपयांचे विलंब शुल्क भरावे लागत आहे. एका व्यक्तीसाठी दहा रुपये किरकोळ असू शकते. मात्र, शहरात सुमारे 19 हजार वीज ग्राहक आहेत. या सर्वांनी दहा रुपये शुल्क भरल्यास ती सुमारे 2 लाखात जाते. संपूर्ण विभागात घरगुती वीज वापराचे सुमारे 45 हजार ग्राहक (शहादा शहर- 19 हजार, उपविभाग 1- 16 हजार आणि उपविभाग 2-10 हजार) आहेत. या सर्वांनी दहा रुपये विलंब शुल्क भरले तर एक महिन्यासाठी ही रक्कम साडे चार लाख होते. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यामुळे वितरण कंपनी आणि बिल वाटप करणाऱ्या एजन्सीच्या मिलीभगत मुळे ग्राहकांची कोणतीही चूक नसताना आर्थिक भुर्दंड भरावा लागत आहे. ग्राहकांना बसणारा हा विलंब शुल्कचा भुर्दंड संबंधित एजन्सी कडून वसूल करण्यात यावा अशी रास्त अपेक्षा ग्राहक करीत आहेत.